Jammu Kashmir : मागील तीन दिवसांपासून धुमसणारं जम्मू काश्मीर अद्यापही त्याच स्थितीत असून आता येथील अनंतनाग भागाला लष्कराच्या छावणीचं रुप प्राप्त झालं आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये जम्मू काश्मीरातील अनंतनाग येथे दहशतवाद्यांशी झालेल्या झटापटींमध्ये 3 अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले. अद्यापही एका जवानाची माहिती मिळू शकलेली नाही. ज्यामुळं आता लष्कराकडून त्या जवानाचाही शोध घेतला जात आहे. बुधवारी (13 सप्टेंबर) अनंतनाग येथे दहशतवाद्यांशी लढा देत असताना मेजर आशिष ढोंचक, काश्मीर पोलीस डीएसपी हुमायूं भट आणि कर्नल मनप्रीत सिंह यांना प्राण गमवावे लागले. 


तीन वर्षांतील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू काश्मीरमध्ये मागील तीन वर्षांमध्ये झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला ठरला आहे. ज्यामध्ये संरक्षण दलातील सेवेत असणाऱ्या मोठ्या हुद्द्यावरील अधिकाऱ्यांना प्राण त्यागावे लागले आहेत. इथं दहशतवादी असल्याचा सुगावा लागताच संरक्षण यंत्रणांनी शोधमोहिम हाती घेतली त्याचवेळी लष्करावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. सलग दुसऱ्या दिवशीही हा संघर्श सुरुच असल्याची माहिती मिळत आहे. 


पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार अनंतनागमध्ये एक जवान शहीद झाला आहे. तर, एक गंभीररित्या दुखापतग्रस्त असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्राथमिक स्तरावर समोर आलेल्या माहितीनुसार या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाशी संबंधित रेजिस्टेंट फ्रंट या संघटनेनं घेतली आहे. 


हेसुद्धा वाचा : किंमत 52,000,000,000 रुपये! मुंबईत जमीनीचा सर्वात मोठा व्यवहार; पाहा नेमका कसा झाला सौदा


 


काश्मीरमध्ये यंदाच्या वर्षी 40 दहशतवाद्यांचा खात्मा 


अनंतनाग येथील संघर्ष हा मागील तीन वर्षांमधील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे. यामध्ये मोठ्या अधिकाऱ्यांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं. यापूर्वी काश्मीरच्या हंदवाडा येथे 30 मार्च 2020 ला जवळपास 18 तास चाललेल्या लष्करी कारवाईत कर्नल, मेजर आणि सबइन्स्पेक्टर यांच्यासह पाचजण शहीद झाले होते. यंदाच्या संपूर्ण वर्षात जम्मू काश्मीरमध्ये 40 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश मिळालं. यामध्ये 8 दहशतवादी काश्मीर खोरं आणि नजीकच्या भागातील असल्याचं सांगण्यात आलं. तर, उर्वरित दहशतवादी सीमेपलिकडून देशात आल्याची बाब समोर आली होती. 


काश्मीरमध्ये अशा लहानमोठ्या कुरापती सुरुच असल्याचं पाहायला मिळालं जिथं काही दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात लष्कराला यश आलं. तर, काहींना कंठस्नान घालण्यात आलं. सीमाभागात अशांतता पसरवणाऱ्या या घटांवर सध्या लष्कर करडी नजर ठेवून त्यांना शासन घडवत असल्याचं पाहायला मिळत आहे.