Jammu Kashmir Attack latest update : देशाच्या सीमाभागात असणाऱ्या जम्मू काश्मीर क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा दहशदवादाची समस्या डोकं वर काढताना दिसत असल्यामुळं आता संरक्षण यंत्रणांच्या चिंतेतही भर पडताना दिसत आहे. नुकतंच काश्मीरच्या बारामुला इथं युद्धजन्य स्थितीमध्ये वापरली जाणारी हत्यारं आणि मोठा शस्त्रसाठा नेणाऱ्या दहशतवाद्याला संरक्षण यंत्रणांनी कंठस्नान घातलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकिकडे दहशतवादाला समूळ नष्ट करण्यासाठीचे प्रयत्न सुरु असतानाच दुसरीकडे या क्रूर कारवाया काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. नुकतंच गांदरबल इथं दहशतवाद्यांनी 7 नागरिकांचा खात्मा केला. लष्कराच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार गुप्तचर यंत्रणांच्या माध्यमातून या संभाव्य घुसखोरीचा सुगावा लागला होता. ज्यानंतर इथं एक दहशतवादविरोधी कारवाई सुरू करण्यात आली. लष्कराच्या कारवाईमुळं दहशतवाद्यांनी या भागात बेछूट गोळीबार सुरू करताच लष्करानंही याच्या उत्तरात गोळीबार केल्याचं पाहायला मिळालं. 


भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सच्या पोस्टनुसार, 'लष्कर, संरक्षण यंत्रणा आणि जम्मू काश्मीरच्या संयुक्त प्रयत्नांनंतर प्रचंड शस्त्रसाठा असणाऱ्या एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. यावेळी घटनास्थळावरून 01xAK रायफल, 02xAK मॅगजीन, 57xAK राउंड्स, 02xपिस्तुल, 03xपिस्तुल मॅगजीन आणि युद्धसमयी वापरात असणारी इतर हत्यारं जप्त करण्यात आली'. यावेळी कैक तास ही कारवाई सुरू असल्याचं सांगण्यात आलं होतं. 


सत्तास्थापनेनंतरच का झाला दहशतवादी हल्ला? 


आपला नेता आपण निवडलेल्या या जम्मू काश्मीर क्षेत्रामध्ये सत्तास्थापनेनंतर दहशतवादी हल्ला का झाला हाच प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. स्थानिक नेत्यांच्या मते सध्या निवडणुकीला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळं दहशतवादी पुन्हा एकदा या भागांमध्ये आपली दहशत निर्माण करू पाहत आहेत. भीतीचं वातावरण तयार करत येथील नागरिकांच्या मनात ते संभ्रम आणि सावधगिरीचं वातावरणही निर्माण करू पाहत आहेत. 


हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : वादळ, अतिवृष्टी अन्... राज्याच्या वेशीवर हवामानाचं रौद्र रुप; कोकण- विदर्भात काय स्थिती? 


दरम्यान, सदर भागांमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली असली करीही केंद्रीय गृहविभाग आणि केंद्र शासनाच्या वतीनं या भागात तैनात असणाऱ्या लष्करी आणि संरक्षण यंत्रणांना कारवाईची मुभा देण्यात आल्यामुळं आता या दहशतवाद्यांना नेमकं कसं प्रतु्यत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.