Maharashtra Weather News : मान्सूननं आता महाराष्ट्राचा निरोप घेतला असून, बरसणाऱ्या पाऊसधारा अवकाळीच्या सरी असल्याचं सूचित होत आहे. सकाळी गुलाबी थंडी, दुपारच्या वेळी उन्हाचा तडाखा आणि सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह रिमझिमणारा पाऊस अशीच परिस्थिती सध्या राज्याच्या काही भागांमध्ये पाहायला मिळत आहे. विदर्भासह मराठवाड्यात मात्र तापमानात वाढ झाली असून, कोकण पट्ट्यामध्ये मात्र पावसासाठी काहीसं पोषक वातावरण निर्माण होताना दिसत आहे.
मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि कोकणात पावसाच्या तुरळक सरी आणि विजांचा कडकडाट होणार असल्याचं सांगितलं जात आहे. याच धर्तीवर राज्यात यलो अलर्टही लागू करण्यात आला आहे. परतीच्या पावसाचा फारसा प्रभाव मुंबई आणि उपनगरांवर दिसत नसल्यामुळं मुंबईच्या कमाल तापमानात काहीशी वाढ झाल्याची नोंद करण्यात आली. शहरातील कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 32 आणि 27 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं आहे. येत्या 48 तासांमध्ये हे तापमान 34 अंशांवर पोहोचण्याचीसुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुढील 48 तासांमध्ये महाराष्ट्रात हे हवामानबदल होत असतानाच तिथं राज्याच्या वेशीवरही हवामान बहुतांशी बदलणार असल्याची चिन्हं पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 48 तासांनंतर वातावरणात बहुतांशी बदल होणार असून, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
अंदमानच्या समुद्रानजीक हवेची चक्राकार स्थिती निर्माण होत असल्यामुळं या वाऱ्यांची तीव्रता आणखी वाढून पुढील 24 तासांपासून प्राथमिक टप्प्यात त्याचं कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर होताना दिसणार आहे. कमी दाबाचं हे क्षेत्र पश्चिम-वायव्य दिशेने सरकत पुढे त्याची तीव्रता वाढू शकते. ज्यानंतर त्यापुढील 24 तासांमध्ये हाच कमी दाबाचा पट्टा आणखी रौद्र रुप धारण करून थेट चक्रीवादळात त्याचं रूपांतर होण्याची शक्यता आहे. परिणामस्वरुप गुरुवारी हे वारे ओडिशा आणि प. बंगालचा किनारा ओलांडून पुढे जाणार असल्यामुळं ओडिशाच्या किनारी भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर, दक्षिण भारतामध्ये तामिळनाडू क्षेत्रामध्येही या वाऱ्यांचे परिणाम दिसणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.