रामबन : देशासाठी तन-मन आणि जीवही अर्पण करणाऱ्या रामबनचे पुत्र असलेल्या लान्स नायक रणजीत सिंह यांच्या घरी मुलीचा जन्म झाला... पण, या मुलीच्या जन्मापूर्वी काही तास अगोदर तिचे वडील शहीद झाल्याची बातमी धडकली होती. इकडे रणजीत सिंह यांचं पार्थिव शरीर घरी दाखल झालं होतं... आणि दुसरीकडे त्यांची पत्नी शिमू देवी यांनी रामबनच्या जिल्हा रुग्णालायात सकाळी पाच वाजल्याच्या सुमारास एका बाळाला जन्म दिला. खरंतर कुणावरही येऊ नये, असा हा मन हेलावून टाकणारा क्षण...


कणखर बाणा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळी ५ वाजता चिमुरडीचा जन्म झाल्यानंतर शहीद रणजीत सिंह यांची पत्नी आपल्या मुलीसह दुपारी १२ च्या सुमारास अॅम्बुलन्सद्वारे आपल्या पतीच्या अंत्यदर्शनासाठी दाखल झाल्या. 


जन्म-मृत्यूच्या या अजब खेळात आता ही चिमुरडी कधीही आपल्या वडिलांना पाहू शकणार नाही. 


या दु:खद प्रसंगानंतर त्या माऊलीनं 'माझ्या पतीप्रमाणे माझ्या मुलीनंही आर्मीत दाखल होऊन देशाची सेवा करावी...' एव्हढंच म्हटलं.


रुग्णालय प्रशासनाची मदत


डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आई आणि नवजात बालक दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. त्यामुळे त्यांना लवकरच हॉस्पीटलमधून सुटी मिळू शकेल. या दु:खद प्रसंगी जिल्हा रुग्णालयाचं प्रशासन या दोघींच्या सोबत आहे आणि त्यांच्यासाठी होईल तेवढे सगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा रुग्णालयाचा प्रयत्न असेल, असंही त्यांनी म्हटलंय.


भावानं केले अंत्यसंस्कार


मंगळवारी शहीद रणजीत सिंह यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी, भारतीय सेना, जम्मू-कश्मीर पोलीस, प्रशासकीय अधिकारी, रामबनचे आमदार आणि स्थानिक मोठ्या संख्येनं उपस्थित झाले होते. रणजीत सिंह यांना त्यांच्या भावानं मुखाग्नि दिला.