J-K: काश्मिरी पंडिताच्या हत्येचं सत्र सुरुच, शाळेत घुसून दहशतवाद्यांनी महिला शिक्षिकेवर झाडल्या गोळ्या
जम्मू-काश्मिरमध्ये महिन्याभरात दहशतवाद्यांच्या हल्ल्याच्या 8 घटना घडल्या आहेत
Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांच्या हत्येचं सत्र सुरुच आहे. दहशतवाद्यांनी कुलगाममधील गोपालपोरा भागात असलेल्या एका शाळेत घुसून दहशतवाद्यांनी महिला शिक्षिकेवर गोळीबार केला. या हल्ल्यात महिला शिक्षिका गंभीर झाली, तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान शिक्षिकेचा मृत्यू झाला.
सुरक्षा दलाच्या कारवाईमुळे दहशतवादी संतप्त झाले आहेत. रजनी राजकुमार असं मृत महिला शिक्षकाचं नाव असून ती सांबा इथली रहिवासी होती.
काश्मीर पोलिसांनी या घटनेची माहिती दिली आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांची लवकरच ओळख पटवून त्यांना कठोर शिक्षा केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
खोऱ्यात हत्यासत्र सुरुच
25 मे 2022 - काश्मिरी टीव्ही अँकर अमीरा भट्ट यांची गोळ्या झाडून हत्या.
24 मे 2022- दहशतवाद्यांनी पोलिस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली. या हल्ल्यात सात वर्षांची मुलगी जखमी झाली.
17 मे 2022 - बारामुल्ला इथल्या एका वाईन शॉपवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकला. या हल्ल्यात रणजित सिंह यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात तीन जण जखमी झाले.
12 मे 2022 - काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांची बडगाममध्ये गोळ्या झाडून हत्या. दहशतवाद्यांनी त्यांच्या कार्यालयात घुसून गोळीबार केला.
12 मे 2022- पुलवामा इथं पोलीस शिपाई रियाझ अहमद ठाकोर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
9 मे 2022 - शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक नागरिक ठार. यात एका जवानासह दोघे जखमी झाले.
2 मार्च 2022 - कुलगाममधील सांडू इथं दहशतवाद्यांनी पंचायत सदस्याची गोळ्या झाडून हत्या केली.
सुरक्षा दलांनी कारवाई केली तीव्र
दुसरीकडे, खोऱ्यातील वाढत्या दहशतवादी घटना पाहता सुरक्षा दलांनी मोहीम अधिक तीव्र केली आहे. गेल्या आठवडाभरात 16 दहशतवादी मारले गेले आहेत.
25 मे - बारामुल्लामध्ये सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या चकमकीत एक जवानही शहीद झाला.
26 मे - कुपवाडा इथं सुरक्षा दलाच्या कारवाईत तीन दहशतवाद्यांचा खात्मा
26 मे - अवंतीपोरा इथं सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. न्यूज अँकर अमीरा भट्टच्या हत्येत या दहशतवाद्यांचा हात होता.
27 मे - श्रीनगरच्या सौरा भागात दोन दहशतवादी मारले गेले
28 मे - अवंतीपोरामध्ये सुरक्षा दलाने दोन दहतवादी ठार केले
29 मे - पुलवामात दोन दहशतवादी ठार
30 मे - अवंतीपोरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा
महबूबा मुफ्ती आणि उमर अब्दुल्लाने व्यक्त केलं दु:ख
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांनी महिला शिक्षिकेच्या हत्येवर शोक व्यक्त केला आहे. मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, भारत सरकार काश्मीरमध्ये सामान्य स्थितीचा दावा करत असतानाही नागरिकांची हत्या होत आहे. ही चिंतेची बाब आहे. मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, मी या भ्याड कृत्याचा निषेध करते.
त्याचवेळी ओमर अब्दुल्ला म्हणाले, हे दुःखद आहे. नि:शस्त्र नागरिकांवरील अलीकडच्या हल्ल्यांमध्ये आणखी एक नाव जोडलं गेलं आहे. परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत शांत बसणार नाही, असं ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलंय.