श्रीनगर : जम्मू-श्रीनगर (Jammu and Kashmir) महामार्गावरील एका टोल प्लाजाजवळ (Toll plaza) शुक्रवारी सकाळी दहशतवाद्यांकडून (terrorists) गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर दहशतवादी जंगलात पळून गेल्याची माहिती मिळत आहे. 




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू-श्रीनगर राजमार्गावर बन्न टोल प्लाजाजवळ पोलिसांकडून श्रीनगरकडे जाणारा एक ट्रक तपासणीसाठी रोखण्यात आला होता. त्यावेळी ट्रकमध्ये बसलेल्या दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरु केला. या घटनेत एक पोलीस जखमी झाला. तर सुरक्षादलाकडून देण्यात आलेल्या प्रत्युत्तरात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. 



अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्च ऑपरेशन सुरु असून यात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. एक दहशतवादी लपला असल्याची शक्यता असून सर्च ऑपरेशन सुरु आहे. 


मारण्यात आलेल्या दहशतवाद्याकडून एके-४७ आणि ग्रेनेड जप्त करण्यात आला आहे. सुरक्षादलाकडून चार ते पाच दहशतवाद्यांना घेराव घालण्यात आला आहे. जम्मू-श्रीनगर महामार्गावर वाहतूक बंद करण्यात आली आहे. नगरोटा या भागात शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 


जम्मू-काश्मीर डीजीपी दिलबाग सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी एका नवीन घुसखोरी करणाऱ्या गटाचे भाग होते आणि ते श्रीनगरला जात होते. त्यांनी कठुआ, हीरानगर हद्दीतून घुसखोरी केल्याचा संशय असून अधिक तपास सुरु आहे.



दरम्यान, जम्मू-काश्मीर पोलीसांनी २८ जानेवारीला उत्तर काश्मीरमधील, बारामूलामधून लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याला ताब्यात घेतलं होतं. ताब्यात घेण्यात आलेल्या १९ वर्षीय दहशतवाद्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.