श्रीनगर : श्रीनगरमधील वागुरा नौगाम सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी शुक्रवारी रात्री उशीरा ग्रेनेड हल्ला केलाय. या भ्याड हल्ल्यात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अर्थात सीआयएसएफचे अधिकारी शहीद झालेत. सीआयएसएफचे ए.एस.आय राजेश कुमार यांना वागुरा नौगाम सेक्टरमध्ये पॉवर ग्रीडच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलं होतं. यावेळी दहशतवाद्यांनी हा भ्याड ग्रेनेड हल्ला केला. यात राजेश कुमार यांना वीरमरण आलं. या परिसरात काही दहशतवादी लपून बसले असल्याची शक्यता वर्तवली जातेय. जवानांनी या परिसरात शोधमोहीम सुरू केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या हल्ल्यानंतर सुरक्षा दलानं भागाला वेढा घातलाय... दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.


चकमक सुरूच 


उल्लेखनीय म्हणजे, जम्मू-काश्मीरच्या बारमुल्ला जिल्ह्यातील सोपोरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांसोबत शुक्रवारी सकाळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते. सोबतच सेनेचे जवान बृजेश कुमारही शहीद झाले होते. शुक्रवारी सकाळी ही चकमक जम्मू-काश्मीरच्या सोपोरच्या पाजलपोरा भागात झाली होती. यामध्ये २२ राजस्थान रायफल्स, एसओजी आणि सीआरपीएफ ९२ ची बटालियनही सहभागी झाली होती. 


गुरुवारीही जम्मू-काश्मीरच्या वेगवेगळ्या भागांत झालेल्या दोन दहशतविरोधी कारवाईत सहा दहशतवादी ठार झाले होते. अनंतनाग जिल्ह्याच्या बिजबेगरामध्ये सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना ठार केलं होतं.