`जय सिया राम`च्या घोषणा देत जावेद अख्तर म्हणाले, `राम फक्त हिंदूंपुरता मर्यादित नसून...`
Javed Akhtar : ज्येष्ठ गीतकार आणि विचारवंत अशी ओळख असणाऱ्या जावेद अख्तर यांनी कायमच विचारांच्या माध्यमातून आपलं वेगळंपण जपलं. त्यांचं असंच एक रुप नुकतंच पाहायला मिळालं...
Javed Akhtar On Lord Ram : सध्या सर्वत्र दिवाळीचा माहोल पाहायला मिळत असून, शहरं, नगरं, गावं आणि संपूर्ण देश... इतकंच काय तर, पदरेश्ही सजला आहे. अशा या आनंदपर्वाच्या निमित्तानं मुंबईतही वेगळाच लखलखाट पाहायला मिळत आहे. मुंबई म्हटलं की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आयोजित केला जाणारा दीपोत्सवही आकर्षणाचाच विषय. अशा या दीपोत्सवाचं उदघाटन गुरुवारी करण्यात आलं.
दादरच्या शिवाजी पार्क येथे या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. जिथं मैदान परिसरामध्ये सुरेख रोषणाईही केल्याचं पाहायला मिळालं. यंदाच्या दीपोत्सवाच्या उदघाटनासाठी हिंदी कलाजगत गाजवणारी पटकथा लेखकांची जोडी अर्थात ज्येष्ठ कलावंत सलीम-जावेद यांची उपस्थिती पाहायला मिळाली.
दीपोत्सवात जय सियारामच्या घोषणा...
साचेबद्ध विचारांना शह देणाऱ्या जावेद अख्तर यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करत काही सुरेख विचार सर्वांपुढे ठेवले. हिंदुत्त्व, भक्ती या साऱ्यापलीकडे जात संस्कृती आणि वासरा या गोष्टींवर त्यांनी प्रकाश टाकला. चित्रपटांच्या दुनियेतील काही गोष्टींचा उलगडा करणाऱ्या जावेद अख्तर यांनी यावेळी 'राम' हा विचार एका वेगळ्या दृष्टीकोनातून मांडला.
हेसुद्धा वाचा : नास्तिक असून धार्मिक कार्यक्रमात कसे? जावेद अख्तर म्हणाले, राज ठाकरेंनी त्यांच्या शत्रूंना...
'श्रीराम किंवा सीता हे फक्त हिंदूंचाच वारसा आहेत, त्यांच्याच धार्मिक अस्मितेचा मुद्दा आहेत असं नाही, मी असं समतच नाही. या देशातील प्रत्येक नागरिकाचे, पृथ्वीवरील स्वत:ला हिंदुस्तानी समजणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी रामायण हा एक सांस्कृतिक वारसा आहे. रामायण किंवा महाभारताविषयी माहिती नाही असा एकही हिंदुस्तानी सापडणार नाही शकत नाही. कारण हाच आपला इतिहास, आपली संस्कृती आणि आपली ओळख आहे', असं अख्तर यांनी स्पष्ट केलं.
यावेळी त्यांनी बालपणीच्या काही आठवणी सर्वांपुढे आणत म्हटलं, 'मी मुळचा लखनऊचा आहे. त्यामुळं लहानपणी आम्ही कायमच काही गोष्टी ऐकल्या आहेत. Good Morning वगैरे म्हणणारी माणसं जरा जास्तच उच्चभ्रू असतात, नाहीतर रस्त्यावरून चालणारे सर्वसामान्य नागरिक मात्र ''जय सिया राम...'' असंच म्हणत होते. थोडक्यात काय, तर या दोघांना (राम आणि सीतेला) वेगळं करण, तसा विचारही करणं एक पापच आहे. हा तर प्रेम, एकता आणि सहजीवनाचा एक आदर्श आहे.' सिया आणि राम यांना फक्त एकाच व्यक्तीनं वेगळं केलं ते म्हणजे रावणानं, त्यामुळं यांना जो वेगळा करेल तोच रावण असेल असं सांगताना त्यांनी 'जय सिया राम'च्या घोषणा दिल्या आणि उपस्थितांनीही हाच सूर आळवला.