नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून (CAA) असलेले मतभेद आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या अनपेक्षित निकालानंतर बिहारमध्ये भाजपचा मित्रपक्ष असलेल्या जनता दलाने (संयुक्त) आगामी विधानसभा निवडणुकीत जागावाटपात आपलाच वरचष्मा राहील, यादृष्टीने हालचाली करायला सुरुवात केली आहे. 'जदयू'चे नेते आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आगामी निवडणुकीत 'जदयू' हाच मोठा भाऊ असेल, असे संकेत दिले आहेत. बिहारमध्ये जदयू हा भाजपपेक्षा मोठा पक्ष आहे. त्यामुळे जदयूने भाजपपेक्षा जास्त जागा लढवायला हव्यात, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वी लोकसभा निवडणुकीवेळी जदयू आणि भाजपने प्रत्येकी १७ तर मित्रपक्ष असलेल्या 'लोजप'ने सहा जागा लढवल्या होत्या. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही हे दोन्ही पक्ष समसमान जागा लढवतील, असे गृहीत धरले जात होते. 


मात्र, आता प्रशांत किशोर यांनी आक्रमक भूमिका घेत समसमान जागावाटपाचे सूत्र नाकारले आहे. २०१० सालीही जदयू आणि भाजपने एकत्ररित्या निवडणूक लढवली होती. त्यावेळीही जागावाटपाचे सूत्र १:१.४ असे होते. आता यामध्ये थोडाफार बदल होणार असला तरी दोन्ही पक्ष समसमान जागा लढवतील, असे कोणीही गृहीत धरू नये. बिहारमध्ये नितीश कुमार हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (रालोआ) चेहरा आहेत. त्यामुळे समसमान जागावाटपाचे सूत्र योग्य नाही, असेही प्रशांत किशोर यांनी सांगितले. 



प्रशांत किशोर यांच्या या वक्तव्यामुळे भाजपच्या गोटात पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. भाजप सभ्यता आणि शिस्त पाळणारा पक्ष आहे. काहीबाही बोलून सनसनाटी निर्माण करणे, ही आमची सवय नाही. आगामी विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाचे सर्व निर्णय वरिष्ठ नेत्यांकडून घेतले जातील, असे भाजपचे प्रवक्ते निखिल आनंद यांनी सांगितले.