दुर्दैव! विहीरीत बैल पडला म्हणून वाचवायला गेलेल्या 6 गावकऱ्यांचा जागीच मृत्यू
Jharkhand News : झारखंडमध्ये एका गावात घडलेल्या या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. बैलाच्या वाचवण्याच्या नादात नऊ पैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफने तीन गावकऱ्यांना वाचवलं आहे.
Accident News : झारखंडमधून (Jharkhand News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बैलाचा (bull) जीव वाचवण्याच्या नादात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर तीन जणांना वाचवण्यात यश आले आहे. या घटनेमुळे झारखंडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. झारखंडमधील रांची (Ranchi) येथील एका गावात एक हृदयद्रावक अपघात घडला आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनीही (CM Hemant Soren) शोक व्यक्त केला आहे.
झारखंडमध्ये एका बैलाला वाचवताना सहा जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. रांचीपासून 70 किमी अंतरावर असलेल्या सिल्ली ब्लॉकच्या मुरी ओपी भागातील पिस्का गावात गुरुवारी रोजी ही घटना घडली. मृत्यू झालेले सर्व लोक हे एकाच गावातील होते. या सहा जणांच्या अपघाती निधनाच्या वृत्ताने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
पिस्का गावात काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे एका विहिरीच्या शेजारील माती सैल झाली होती. त्याच दरम्यान, गुरुवारी दुपारी चार वाजता गावातील एक त्या बैल विहिरीत पडला. त्याला वाचवण्यासाठी नऊ जण विहिरीत उतरले होते. सर्वजण बैलाला दोरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र अचानक विहिरीची माती खचली. यामुळे सर्व लोक विहिरीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. त्यात तीन जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. मात्र सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र मुसळधार पाऊस कोसळत असल्याने मदतकार्य सुरु करता आले नाही. शेवटी रात्री उशिरा एक वाजता बचावकार्यास सुरुवात झाली. बचावकार्य दुसऱ्या दिवसापर्यंत सुरु होते. बचाव कार्यात विक्रांत मांझी नावाच्या व्यक्तीला वाचवण्यात एनडीआरएफला यश आले. त्याच्या डोक्याला जखम झाली आहे. या अपघातात विक्रांतच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे.
नेमकं काय घडलं?
"माझे वडील शेतात काम करत होते. त्यावेळी माझ्या लहान भावाने त्यांना एक बैल विहिरीत पडल्याचे सांगितले. हे ऐकून ते मदतीसाठी गेले. मीही त्यांच्या मागे गेलो. काही तासांनंतर मला बाहेर काढण्यात आले. पण माझे वडील परत बाहेर येऊ शकले नाहीत," असे विक्रांतने सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विहीरीत पडलेल्या बैलाला वाचवण्यासाठी पाच जण खाली उतरले होते. तर चारजण विहीरीवर उभे होते. माती खचल्याने सर्वचजण 40 फूट खोल विहीरीत खाली गाडले गेले. दुपारी बैल विहीरीत पडल्यानंतर हा सगळा प्रकार घडला आहे. नऊ लोक आत गेले होते. त्यातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती रांचीचे पोलीस अधिक्षक एचबी जामा यांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
"सिल्लीच्या मुरी भागात असलेल्या पिस्का गावात विहिरीत पडून लोकांचा मृत्यू झाल्याच्या दु:खद बातमीने दुःख झाले. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि शोकाकुल कुटुंबीयांना या दु:खाच्या वेळी सहन करण्याची शक्ती देवो," असे ट्वीट मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केले आहे.