झारखंड : झारखंडमध्ये (Jharkhand) रविवारी संध्याकाळी एक मोठी दुर्घटना घडली. सर्वात उंच असलेल्या त्रिकूट (Trikoot) रोपवेच्या (Rope Way) दोन ट्रॉली एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातामुळे ट्रॉली मध्येच अडकल्या असून 48 जण गेल्या 20 तासांपासून फसले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर एनडीआरएफने (NDRF)बचावकार्य सुरू केलं. पण भरपूर उंचावर असल्याने मदतीसाठी लष्कराला पाचारण करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, पर्यटक अजूनही ट्रॉलीमध्ये अडकले असून त्यांना ड्रोनद्वारे अन्न आणि पाणी दिलं जात आहे.


रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने शेकडो पर्यटक पर्यटनासाठी त्रिकूट इथं दाखल झाले होते. यावेळी रोपवेची एक ट्रॉली खाली येत होती, तर त्याचवेळी वरती जाणाऱ्या ट्रॉलीली ती धडकली. हा अपघात झाला त्यावेळी जवळपास दोन डझन ट्रॉली टेकडीवर जात होत्या. या सर्व ट्रॉली मध्येच थांबल्या.


48 पर्यटक अडकले
या दुर्घटनेला 20 तासांहून अधिक काळ लोटला असून अजूनही बचावकार्य सुरु आहे. 18 ट्रॉली अडकल्या असून त्यात 48 जण प्रवास करत असल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे. या अपघातात अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. 


बचावकार्यात अनेक अडथळे
लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी लष्कराने हेलिकॉप्टरची मदत घेतली पण हेलिकॉप्टरच्या पंख्याच्या जोरदार वाऱ्यामुळे ट्रॉली हलत असल्याने अडचणी येत आहेत. अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मंजुनाथ भाईजंत्री यांनी दिली आहे. 


अपघातात एका महिलेचा मृत्यू
बचावासाठी MI-17 ही दोन हेलकॉप्टर मदत करत असल्याची माहिती भारतीय हवाई दलाने दिली आहे. आठ लोकाना आतापर्यंत बाहेर काढण्यात आलं असून अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.