नवी दिल्ली - राजस्थानमधील रामगढ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार शाफिया जुबैर यांनी १२२२८ मतांनी विजय मिळवला. पहिल्या फेरीपासून शाफिया जुबैर या मतमोजणीत आघाडीवर होत्या. शेवटपर्यंत त्यांची आघाडी कायम राहिली आणि अखेर त्यांनी विजय प्राप्त केला. २०१३ मध्ये झालेल्या निवडणुकीत ही जागा भाजपने जिंकली होती. दुसरीकडे हरियाणातील जिंद विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपने विजय मिळवला आहे. भाजपचे उमेदवार क्रिशन मिधा यांनी जननायक जनता पार्टीचे उमेदवार दिग्विजय सिंह चौताला यांचा १२९३५ मतांनी पराभव केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरियाणातील जिंद आणि राजस्थानमधील रामगढ पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी गुरुवारी झाली. रामगढमध्ये मतमोजणीच्या दहाव्या फेरीअखेर या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार जुबैर यांना ९३२० मतांची आघाडी मिळाली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे सुखवंत सिंह पहिल्या फेरीपासून मागे होते. पहिल्या फेरीमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला ९७७३ मते मिळाली तर भाजपच्या उमेदवाराला ७०९४ मते मिळाली. 


नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले होते. यापैकी मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थानमध्ये भाजप सत्तेतून पायउतार झाला होता. त्यानंतर होत असलेल्या या पोटनिवडणुकीतही भाजपला चमकदार कामगिरी करता आलेली दिसत नाही. येत्या तीन महिन्यात देशात लोकसभेची निवडणूक होते आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीचे निकाल काही अंशी महत्त्वाचे ठरणार आहेत. राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट मतमोजणी सुरू होण्यापूर्वी म्हणाले, रामगढची निवडणूक काँग्रेसच जिंकेल, याचा आम्हाला विश्वास आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने काँग्रेसच्या बाजूने मतदान केले होते. रामगढमध्येही हेच चित्र कायम राहिल, असे आम्हाला वाटते. २०१३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत रामगढची जागा भाजपने जिंकली होती. यावेळी या मतदारसंघात तिरंगी लढत असल्याचे पाहायला मिळाले होते. पण अखेर काँग्रेसनेच या जागेवर विजय प्राप्त केला.


जिंदमध्ये पहिल्यांदाच भाजपने विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.