`शांतीदूता`च्या हत्याकांडातून दहशतवादी काय साध्य करू पाहतायत?
कोण होते शुजात बुखारी?
श्रीनगर : 'रायझिंग काश्मीर'चे संपादक शुजात बुखारी यांच्या हत्येप्रकरणी तीन संशयित दहशतवाद्यांचे फोटो जारी करण्यात आले आहे. बुखारींच्या हत्येनं राज्यातल्या स्फोटक परिस्थिती पुन्हा एकदा प्रकाश झोतात आलाय. बाईकवरून आलेल्या तीन दहशतवाद्यांचा फोटो चौकशी यंत्रणेनं जाहीर केलेत. याच तीन दहशतवाद्यांनी काश्मीरचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलाय. श्रीनगरमध्ये भर चौकात 'रायझिंग काश्मीर' या इंग्रजी वृत्तपत्राचे संपादक शुजात बुखारींची हत्या केलीय. रमझानच्या पवित्र महिन्यात दहशतवाद्यांनी घडवलेल्या या रक्तपातामुळे काश्मीरमध्ये संतापाची लाट उसळलीय. हत्येमुळे काश्मीरमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांची स्थिती काय आहे, याची पुरेपूर कल्पना आल्याशिवाय राहत नाही.
कोण होते शुजात बुखारी?
- शुजात बुखारी काश्मीरमध्ये गेली ३५ वर्ष पत्रकारिता करत होते
- बुखारी रायझिंग काश्मीर या स्थानिक इंग्रजी दैनिकाचे संपादक होते
- त्याआधी जवळपास १५ वर्ष ते 'द हिंदू' या इंग्रजी वृत्तपत्राचे ब्युरो चीफ म्हणून काम करत होते
- गेल्या दशकभरापासून भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यासाठी बुखारी सातत्यानं प्रयत्न करत दोन्ही देशातील शांती प्रक्रियेत पडद्यामागे काम करणाऱ्यांमध्य़े बुखारींची महत्त्वाची भूमिका होती
'शांतीदूता'ला बाजुला केलं...
दहशतवाद्यांनी शांतीदूताला रस्त्यातून बाजूला करण्यासाठी हे हत्याकांड घडवून आणलं. या हत्येनंतर आता राजकारणही तापू लागलं आहे. राज्य सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचे आरोप होऊ लागले आहेत.
काश्मीरमध्ये गेल्या काही वर्षात १२ पत्रकारांवर हल्ले झालेत. सामान्य नागरिक तर दररोजच दहशतवाद्यांच्या कारवायांचे बळी पडत आहेत. गेल्या सहा महिन्यात शहीद झालेल्या जवानांची संख्याही वाढतेच आहे. रक्तरंजित क्रांतीच्या मागे लागलेल्या काश्मीरातल्या तरुणांची संख्याही वाढतेय. स्फोटक स्थितीवर नियंत्रण मिळवण्याचं कठीण आव्हान आता सरकार आणि सुरक्षा यंत्रणांसमोर उभं राहिलंय.