काश्मीर: लष्करावर स्थानिकांकडून तुफान दगडफेक, प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू
या घटनेनंतर दक्षिण काश्मीरमधील कुलगाम, शोपियान, अनंतनाग आणि पुलवामा या जिल्ह्यांतील मोबाईल व इंटरनेटसेवा खंडित करण्यात आली आहे.
श्रीनगर: काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात शनिवारी उसळलेल्या हिंसाचाराला आटोक्यात आणताना भारतीय लष्कराला तीन जणांवर गोळीबार करावा लागला. यामध्ये एका अल्पवयीन मुलासह तीन जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले आहेत. स्थानिकांच्या माहितीनुसार, भारतीय लष्कराने काही तरुणांना ताब्यात घेतल्यामुळे या आंदोलनाला सुरुवात झाली. हिंसक झालेल्या जमावाने लष्कराच्या जवानांवर दगडफेक करायला सुरुवात केली. अखेर जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराला नाईलाजाने गोळीबार करावा लागला. या घटनेनंतर दक्षिण काश्मीरमधील कुलगाम, शोपियान, अनंतनाग आणि पुलवामा या जिल्ह्यांतील मोबाईल व इंटरनेटसेवा खंडित करण्यात आली आहे.