मुंबई : शिपिंग सर्व्हिस कंपनी जे एम बक्शी प्रकरणाला आता एक वेगळं वळण मिळालय. या प्रकरणातील काही आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतलीय. बुधवारी सत्र न्यायालय स्थित सीबीआयच्या विशेष न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार होती. यासाठी आरोपींचे वकील आणि सीबीआयचे वकील विमल सोनी हेदेखील न्यायालयात उपस्थित होते. न्यायालयात सुनावणी सुरू होणार होती तेव्हाच आरोपींच्या वकिलांनी कोर्टात, आरोपींनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावल्याचं सांगितलं. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी टळली. या प्रकरणात आरोपींनी काहीही बोलण्यास नकार दिला. 


अधिक वाचा : 'जे एम बक्शी' शिपिंग कंपनीविरोधात आर्थिक घोटाळ्याची तक्रार दाखल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी फेब्रुवारी २००९ मध्ये सीबीआयनं अशाच एका तक्रारीच्या आधारावर शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या काही अधिकाऱ्यांना आणि जे एम बक्शी कंपनीच्या मालकांसमवेत इतर आरोपींविरोधात आयपीसी कलम १२० बी, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ आणि प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्टच्या कलम १३ (२) आणि १३ (१) (डी) नुसार तक्रारीची नोंद केली होती. 



या प्रकरणात २०१० साली चौकशी एजन्सी सीबीआयनं शिपिंग कॉर्पोरेशनचे अधिकारी डी. पी. रेवावाल, एन आर सरैया, वैशाली लाडी, हरिप्रकराश कामथ यांच्यासमवेत जे एम बक्शी कंपनी आणि त्यांचा पार्टनर कृष्णा कोटक यांच्याविरुद्ध मुंबईच्या विशेष सीबीआय न्यायालयात चार्जशीट दाखल केली होती. विशेष सीबीआय न्यायालयानं यापूर्वी जे एम बक्शीचे कृष्णा कोटक यांच्यासमवेत इतर आरोपींच्या खटला रद्द करण्यासाठीच्या याचिकेला केराची टोपली दाखवलीय. केवळ सरैया आणि लाडी यांना मुंबई उच्च न्यायालयानं आरोपांतून मुक्त केलंय.