'जे एम बक्शी' शिपिंग कंपनीविरोधात आर्थिक घोटाळ्याची तक्रार दाखल

'जे एम बक्शी' ही कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून भारतात शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या २० हून अधिक बंदरांवर आपली सेवा प्रदान करत आहे

Updated: Nov 14, 2019, 12:56 PM IST
'जे एम बक्शी' शिपिंग कंपनीविरोधात आर्थिक घोटाळ्याची तक्रार दाखल

संजय सिंह-राकेश त्रिवेदी, झी मीडिया, मुंबई : माहिती अधिकार कार्यकर्ते असद पटेल यांनी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केलीय. 'शिपिंग सर्व्हिस' क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांपैंकी एक 'जे एम बक्शी एन्ड कंपनी'चाही तक्रारीत समावेश आहे.

शिपिंग कॉर्पोरेशनच्या 'डायरेक्टर ऑफ ग्रिव्हेन्सेस'ला ११ नोव्हेंबर रोजी धाडण्यात आलेल्या तक्रारीत आरटीआय कार्यकर्ते पटेल यांनी शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये पैशांची अफरातफर आणि व्यवहारात पारदर्शकतेच्या कमतरतेचा आरोप ठेवलाय.


आरटीआय कार्यकर्ते असद पटेल

 

तक्रारकर्त्यांच्या आरोपांनुसार...

- 'जे एम बक्शी' ही कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून भारतात 'शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'च्या २० हून अधिक बंदरांवर आपली सेवा प्रदान करत आहे.

- अनेक नियमांची पायमल्ली करत 'शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया' या कंपनीकडून १९६१ पासून सेवा घेत आहे. 

- १९९९ सालीही प्रक्रियेविनाच या कंपनीला कॉर्पोरेशनकडून 'एजन्ट' म्हणून नियुक्त करण्यात आलं. अनेकदा कंपनीकडून बिल घेतल्याशिवाय एडव्हान्स पेमेंट करण्यात आलं.

- कित्येक वर्ष कंपनीनं अकाऊंट सेटल करताही कॉर्पोरेशनकडून या कंपनीला पैसे मिळत राहिले. 

- शिपिंग कॉर्पोरेशनशिवाय व्हिजिलन्स विभाग आणि शिपिंग मंत्रालयाला धाडण्यात आलेल्या तक्रारीनुसार, जे एम बक्शीनं बिलं चुकवल्याशिवाय ऑडिट स्क्रुटिनी स्वीकारली गेली... त्यामुळे कॉर्पोरेशनला लाखोंचं नुकसान झालं

तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार, शिपिंग कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी कंपनीसोबत हातमिळवणी करत ही आर्थिक घोटाळा घडवून आणलाय. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई व्हावी, अशीही मागणी त्यांनी केलीय. 

दुसरीकडे, जे एम बक्शी कंपनीचे सीनिअर व्हाईस प्रेसिडंट रजनीश खंडेलवाल यांनी झी मीडियाला मेलवरून 'हे सगळे आरोप आधारहीन आणि असत्य' असल्याचं म्हटलंय.