नवी दिल्ली : केवळ आयटी क्षेत्रच नव्हे तर, देशातील अनेक बड्या कंपन्यांतील कामगारांवर बुरे दिनची वेळ आली आहे. अनेक कंपन्यांमधून कामगारांना काढून टाकले जात आहे. तर काही कंपन्यांमध्ये विविध कारणांमुळे कामगार स्वत:च नोकरी सोडत आहेत. एका अहवालानुसार आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये अनेक कंपन्यांमध्ये आगोदरच्या वर्षाच्या तुलनेत कमी नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसने एका अहवालाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात मागील आर्थिक वर्षात उपलब्ध झालेल्या ७४२०१२ नोकऱ्यांच्या तुलनेत सुरू आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये केवळ ७३०६९४ नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत. आपल्याकडे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि फायनान्शिअल सर्विस सेक्टरमधील कंपन्या सोडून बॉम्बे स्टॉक एक्सचेंजकडे (बीएसए) नोंदणी असलेल्या अन्य १२१ कंपन्यांनी दिलेल्या नोकऱ्यांची आकडेवारी असल्याचा दावा करताना धातू, उर्जा, कॅपीटल गुड्स, बांधकाम क्षेत्र आणि एमएमसीजी क्षेत्रात या नोकऱ्या घटल्याचे एक्सप्रेसने म्हटले आहे.


१२१ पैकी १०७ कंपन्यांमध्ये घटत्या नोकऱ्यांचे प्रमाण गेले सलग ३ वर्षे सुरू आहे. या १०७ कंपन्यांमध्ये मार्च २०१५ मध्ये तब्बल ६८४४५२ कर्मचारी होते त्यापैकी मार्च २०१६ मध्ये ६७७२९६ इतकेच राहिले. तर, मार्च २०१७ पर्यंत ही संख्या आणखी घटून ६६९४५२ वर पोहोचली. नोकऱ्यांचे घटत असलेले प्रमाण वरवर पाहता कमी वाटत असले तरी हे भविष्यासाठी वाईट संकेत असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.