मुंबई : कोरोना काळात नोकऱ्यांचा मुद्दा किंबहुना नोकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला. अनेकांच्या नोकऱ्या या संकटामध्ये हिरावल्या गेल्या, तर काहींनी नव्या नोकरीच्या शोधार्थ महत्त्वाची पावलं उचलली. संपूर्ण जगासमवेत भारतातही नोकरी क्षेत्रामध्ये असंच चित्र दिसून आलं. तर, नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या अनेकांचा कल काही ठराविक गोष्टींकडे दिसून आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रिटनच्या प्रिन्स चार्ल्स यांच्याद्वारे सुरु करण्यात आलेल्या प्रिन्स ट्रस्ट (Prince Trust)द्वारे करण्यात आलेल्या एका निरीक्षणातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार बहुतांश भारतीयांसमवेत जगातील अनेक तरुणांनाच अशी नोकरी हवी आहे ज्या माध्यमातून जगापुढं असणाऱ्या अनेक अडचणी दूर करण्यासाठी हातभार लावला जाईल. HSBC च्या प्राधान्यानं करण्यात आलेल्या  ‘फ्यूचर ऑफ वर्क’ या आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधनातून ही माहिती समोर आली आहे की, भारतातील जवळपास 85 टक्के तरुण पिढी ही ग्रीन जॉब अर्थात पर्यावरण क्षेत्राशी संबंधित क्षेत्रात नोकरी करण्यासाठी उत्सुक आहे. सध्याच्या घडीला मात्र इथं फक्त 4 टक्के युवाच काम करत आहेत.


पर्यावरणस्नेही जगाच्या निर्मितीसाठी उचलली जाणारी पावलं पाहता, गेल्या बऱ्याच काळापासून या क्षेत्राला वेगळीच उभारी आल्याचं स्पष्ट होत आहे. मुख्य म्हणजे याचे सकारात्मक परिणामही दिसू लागले आहेत. त्यामुळंच साचेबद्ध नोकरीपेक्षा तरुणाईनं सध्या या नव्या वाटांना प्राधान्य दिलं आहे.


नोकरीसंदर्भातील या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 84 टक्के तरुणांच्या मते सध्याची तरुण पिढी ही समाजाच्या अनेक अडचणी दूर करु शकते. याचसंदर्भात प्रिन्स चार्ल्स यांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. 'सध्याची तरुणाई ही जैवविविधतेच्या संकटावर मात करण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये नेतृत्त्व करु इच्छित आहे. माझ्या मते ही आपली जबाबदारी आहे की शक्य असल्याच त्यांची ही इच्छा पूर्ण करण्यास आपण मदत करु', असं ते म्हणाले.


डिजिटल क्षेत्रालाही तरुणाईची पसंती


डिजिटल क्षेत्रालाही भारतातील युवा पिढीची पसंती मिळताना दिसत आहे. 83 टक्के तरुणांनी डिजिटल अर्थव्यवस्थेशी निगडीत क्षेत्रात नोकरी करण्यात रस दाखवला आहे. मागील काळापासून या क्षेत्रात होणारे बदल आणि प्रगती पाहता तरुणाईचा कल नेमका या क्षेत्राकडे का आहे याची कारणंही स्पष्ट होत आहेत.