बंगळुरू : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश (५५ वर्ष) यांच्यावर बुधवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यापूर्वी त्यांच्या विचारांचा सन्मान करत त्यांचं नेत्रदान करण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहरातील चामराज पेट स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी 'अमर रहे गौरी लंकेश' अशा घोषणाही देण्यात आल्या.


गौरी यांचे भाऊ इंद्रजीत यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंत्यसंस्कारावेळी कोणत्याही धार्मिक परंपरांचं पालन करण्यात आलं नाही. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे नेत्रदान करण्यात आले.


कन्नड पत्रिका 'लंकेश पत्रिके'च्या या संपादिकेला बंदूकीच्या गोळ्यांनी सलामी दिली गेली. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैय्या, माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोइली आणि इतर नेत्यांनी गौरी यांना श्रद्धांजली अर्पण केली. एसआयटीकडे गौरी यांच्या हत्येचा तपास सोपवण्यात आलाय.


मंगळवारी गौरी लंकेश यांची त्यांच्या राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेचा समाजातील सर्व स्तरांतून निषेध होतोय.