आज भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड
शहा यांच्या काळात भाजपने आक्रमक विस्ताराचे धोरण अवलंबले होते.
नवी दिल्ली: भाजपकडून आज नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. या पदासाठी जे.पी. नड्डा यांचे नाव आघाडीवर आहे. सकाळी साडेदहाच्या सुमारास भाजपच्या मुख्यालयात अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. परंतु, सूत्रांच्या माहितीनुसार आता केवळ जे.पी. नड्डा यांच्या निवडीची औपचारिकता बाकी राहिली आहे. अध्यक्षपदासाठी अद्याप कोणीही अर्ज सादर केलेला नाही. त्यामुळे नड्डा यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे हिमाचल प्रदेशातून हजारो कार्यकर्ते दिल्लीला रवाना झाले आहेत. सध्या जे पी नड्डा हे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. ते अमित शाह यांचे निकटवर्तीय मानले जातात.
यापूर्वी अमित शहा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. शहा यांच्या काळात भाजपने आक्रमक विस्ताराचे धोरण अवलंबले होते. शहा यांच्या धोरणामुळे भाजपला अनेक राज्यांमध्ये यश मिळाले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर शहा यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यामुळे आता या पदावर कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.