नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील आज पहिलं वर्ष पूर्ण होत आहे. दुसऱ्या कार्यकाळातील वर्षपूर्तीच्या निमित्ताने भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी नरेद्र मोदी सरकारचं कौतुक केलं आहे. 'हे वर्ष आपल्या कठोर आणि मोठ्या निर्णयांसाठी ओळखले जाईल, या निर्णयांनी देशाचा चेहरा बदलला आहे', असं ते म्हणाले. पंतप्रधान मोदींचं कौतुक करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी धोरणांनी देशाच्या लोकशाहीला नवीन दिशा दिली असल्याचं ते म्हणाले. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोठे, बलाढ्य देश ज्यावेळी कोरोना व्हायरसपुढे हतबल झाले आहेत, त्यावेळी भारताची स्थिती मात्र नियंत्रणात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात योग्यवेळी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली असल्याचं, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सांगितलं. 


इतर देशांच्या तुलनेत भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाविरोधातील लढाई ज्याप्रमाणे हाताळली त्यामुळेच आता कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. भारत अशावेळी स्वत:ला सांभाळत आत्मनिर्भर होत आहे. सुरुवातीला भारतात कोरोना कोरोना चाचण्यांची क्षमता केवळ 10 हजार प्रति दिवस होती. मात्र आता ही क्षमता 1.60 लाख प्रति दिवसवर पोहचली आहे. आज देशात जवळपास 4.50 लाख पीपीई किट्स दररोज बनत असून 58 हजार व्हेंटिलेटर्स बनत असल्याचंही ते म्हणाले.


'गेल्या एक वर्षात मोठे निर्णय घेण्यात आले'


नड्डा यांनी काश्मीरचा उल्लेख करत, गेल्या एक वर्षात मोदी सरकारने मोठे निर्णय घेतल्याची आठवण करुन दिली. मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या वर्षात अनेक निर्णय घेण्यात आले. जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद 370 आणि 35A रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मोदींच्या निर्णयामुळे आज CAA लागू झाल्याने अनेक अल्पसंख्यांकांना मुख्य प्रवाहात सामिल होण्याची संधी मिळाली असल्याचंही ते म्हणाले.



दुसऱ्या कार्यकाळातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या एतिहासिक आणि अभूतपूर्व वर्षपूर्तीनिमित्त जेपी नड्डा यांनी मोदींचं अभिनंदनही केलं आहे.