नवी दिल्ली : काँग्रेस मध्यप्रदेशात सत्ता स्थापना करणार हे आता निश्चित झालंय. दुपारी चार वाजता आमदारांची बैठक होणार आहे. त्यात विधीमंडळ पक्षाचा नेते निवडण्यात येईल. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांच लक्ष आहे. राहुल गांधी कमलनाथ यांना राज्यात परत पाठवतात की ज्योतिरादित्य शिंदेच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडते यावरून सध्या भोपाळमध्ये जोरदार चर्चा रंगू लागल्यात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री म्हणून कमलनाथ यांचं नाव देखील चर्चेत आहे, पण आणखी युवा चेहरा मुख्यमंत्री म्हणून द्यायचा असेल, तर ज्योतिरादित्य शिंदे यांच्यादेखील नावाचा विचार होण्याची शक्यता वाढली आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांचे वडील माधवराव शिंदे हे देखील काँग्रेसचे विश्वासू नेते होते. दुर्देवाने माधवराव शिंदेंचा अपघाती मृत्यू झाला होता.


पाच राज्यातल्या निवडणुकीच्या निकालानंतर आज बसपाच्या प्रमुख मायावतींनी मध्य प्रदेशात काँग्रेसला पाठिंबा जाहीर केलाय. मध्य प्रदेशात काँग्रेसला ११४ जागा मिळाल्या आहेत. त्यात समाजवादी पक्षाच्या एका आमदारानं आधीच त्यांना पाठिंबा दिलाय. त्यापाठोपाठ बसपाच्य दोन आमदारांचा पाठिंबा मिळाल्यानं आता काँग्रेसनं बहुमाताचा आकडा ओलांडलाय. काँग्रेसकडे आता ११७ आमदार असून भाजपाकडे सध्या १०९ आमदार आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस दावा करणार स्पष्ट आहे. आज सकाळी काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आलीय... दुसरीकडे तिकडे राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी उद्या काँग्रेसच्या आमदारांना भेटीची वेळ दिलीय. 


मध्य प्रदेशाच्या निकालात सर्वात जास्त अटीतटीची लढाई पाहायला मिळाली. २३० जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत ११६च्या जादुई आकड्यापर्यंत काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांना पोहोचता आलेलं नाही... तब्बल २४ तासांनी मतमोजणी आटोपलीय काँग्रेसनं ११४ जागांवर विजय मिळवलाय तर भाजपाचे १०९ आमदार निवडून आले आहेत.  समाजवादी पक्ष आणि बसपानं काँग्रेसला पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे आता काँग्रेसकडे एकूण ११७ आमदार आहेत.