देशात सर्वाधिक गुंतवणुकीचा ओघ `या` राज्याकडे; महाराष्ट्र, गुजरातला टाकले मागे
९ महिन्यांत भारताला १,४८६ प्रस्ताव मिळाले.
नवी दिल्ली: यंदाच्या आर्थिक वर्षात गुंतवणुकीच्याबाबतीत कर्नाटकने महाराष्ट्र आणि गुजरातला मागे टाकल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, २०१८-१९ च्या पहिल्या तिमाहीत कर्नाटक सरकारकडे तब्बल ८३,२३६ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव आले आहेत.
यंदा देशातील विविध राज्यांकडे गुंतवणुकीसाठी एकूण ३.३८ लाख कोटी रुपयांचे प्रस्ताव आले आहेत. यापैकी २५ टक्के गुंतवणुकीचे प्रस्ताव एकट्या कर्नाटकसाठी आहेत.
९ महिन्यांत भारताला १,४८६ प्रस्ताव मिळाले. त्यापैकी कर्नाटकात ९६ प्रकल्प होणार आहेत. म्हणजेच कर्नाटकासाठी आलेले बहुतांश प्रकल्प मोठे आहेत.
गुजरातमध्ये कर्नाटकपेक्षा चार पट अधिक ३४७ तर महाराष्ट्रात २७५ प्रकल्प प्रस्तावित आहेत. पण प्रकल्पांचे मूल्य पाहता गुजरातमध्ये ५९,०८९ कोटी रुपये तर महाराष्ट्रत ४६,४२८ कोटी रुपयांचे प्रकल्प प्रस्तावित आहेत.