येडियुरप्पा सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, १७ आमदारांना कॅबिनेट मंत्रीपद
आज १७ जणांनी कॅबिनेटमंत्री पदाची शपथ घेतली.
बंगळुरु : येडियुरप्पा सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला. एकूण १७ आमदारांनी आज शपथ घेतली. जनता दल सेक्युलर आणि काँग्रेसच्या आघाडी सरकारनं बहुमत गमावल्यावर येडियुरप्पांनी २६ जुलै रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर विधानसभेत बहुमत सिद्ध केलं. चौथ्यांदा मुख्यमंत्रीपद स्वीकारताना फक्त येडियुरप्पांनीच शपथ घेतली होती. त्यानंतर आज त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. आज १७ जणांनी कॅबिनेटमंत्री पदाची शपथ घेतली. त्यात माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांच्यासह कर्नाटकातील अनेक दिग्गजांचा समावेश आहे.
जुलैमध्ये कर्नाटकात झालेल्या राजकीय भूकंपानंतर २५ दिवसांनी येडियुरप्पा सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. सरकार स्थापन करण्यासाठी जेडीएस आणि काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी भाजपला मदत केली. बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द केल्यामुळे आता या आमदारांना काय मिळणार याकडे देखील लक्ष लागलं आहे.
आज मंत्रिमंडळाच्या विस्तारात माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार, दोन माजी उप-मुख्यमंत्री के.एस.ईश्वरप्पा, आर.अशोक, अपक्ष आमदार एच.नागेश, श्रीनिवास पुजारी आणि लक्ष्मण सावदी (जे विधानसभा आणि विधानपरिषदेचे सदस्य नाही), गोविंद एम.करजोल, अश्वथ नारायण सी.एन, बी.श्रीरामुलु, एस.सुरेश कुमार, वी.सोमन्ना, सी.टी.रवी, बासवराज बोम्मई, जे.सी.मधु स्वामी, सी.सी.पाटील, प्रभु चव्हाण, शशिकला जोले यांनी शपथ घेतली. कर्नाटकच्या मंत्रिमंडळात एकूण ३४ मंत्रीच असू शकतात.
मंगळवारी कॅबिनेटच्या मंत्रिमंडळ विस्ताराआधी सोमवारी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. येडियुरप्पा यांनी म्हटलं की, 'मी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून यादी घेण्यासाठी जात आहे.'