बंगळुरू: सध्या सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोत दोन व्यक्ती जमिनीवरील अंथरुणावर झोपलेल्या दिसत आहेत. सुरुवातीला सोशल मीडियावर हा फोटो फिरत असताना अनेकांना याचा उलगडा झाला नव्हता. मात्र, फोटो बारकाईने पाहिल्यानंतर जमिनीवर झोपलेली व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी असल्याचे स्पष्ट झाले. ही बाब लक्षात आल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एरवी राजकारण म्हटले की साध्या नगरसेवकाचा थाटही राजाला लाजवेल, असा असतो. मात्र, या फोटोत कुमारस्वामी टी-शर्ट आणि पायजमा अशा साध्या वेषात दिसत आहेत. मुख्यमंत्री म्हटले की, त्यांच्या पायाशी सर्व सुविधा लोळण घेताना दिसतात. मात्र, या फोटोत कुमारस्वामी जमिनीवर चादर अंथरून झोपलेले दिसत आहेत. साहजिकच या सगळ्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली होती. 


अखेर काही वेळानंतर या साऱ्या प्रकाराचा उलगडा झाला. एचडी कुमारस्वामी हे सध्या ग्राम प्रवास कार्यक्रमातंर्गत राज्यभरात दौरा करत आहेत. ते शुक्रवारी कलबुर्गीच्या अफजलपूर तालुक्यातील हेरूर गावात गेले होते. यावेळी प्रचंड पाऊस पडत असल्याने कुमारस्वामी यांना पुढील कार्यक्रम रद्द करावा लागला. 


कुमारस्वामी हेरूरमध्येच ऐनवेळी मुक्कामाला राहिल्याने येथील प्राथमिक शाळेत त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली. विशेष म्हणजे कुमारस्वामी यांनी याठिकाणी कोणताही बडेजाव न करता जमिनीवर अंथरूण टाकून झोपणे पसंत केले. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.



लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या प्रचंड यशाचा धसका अनेक प्रादेशिक पक्षांनी घेतला आहे. अनेक राज्यांमध्ये भाजपच्या झंझावातासमोर मोजके अपवाद सोडल्यास काँग्रेससह प्रादेशिक पक्षांचीही पूर्णपणे वाताहत झाली होती. कर्नाटकमध्येही मध्यावधी निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच कुमारस्वामी यांनी कंबर कसल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु आहे.