Crime News : कर्नाटकची (Karnataka Crime) राजधानी बंगळुरुमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बंगळुरूमध्ये वरिष्ठ भूवैज्ञानिक म्हणून काम करणाऱ्या महिलेची तिच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली. बंगळुरूमध्ये एका महिला भूवैज्ञानिकाची गळा चिरून हत्या केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी रात्री घडल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी (Karnataka Police) दिलेल्या माहितीनुसार, गळा आवळून व गळा चिरल्याने मृत्यू झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भावाचा फोन न उचलल्याने झाला खुलासा


एस. प्रतिमा असे 43 वर्षीय मृत महिलेचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच, बंगळुरू शहराच्या दक्षिण विभागाचे पोलीस उपायुक्त राहुल कुमार शाहपूरवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. "नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री 8 वाजता प्रतिमा घरी परतली होती. प्रतिमाने रात्री उशिरा आणि आज (रविवार) सकाळी मोठ्या भावाच्या फोनला उत्तर न दिल्याने तो तिचा शोध घेण्यासाठी बहिणीच्या घरी गेला होता. तिथे त्याला प्रतिमाच्या हत्येची माहिती मिळाली. त्याने पोलिसांना माहिती दिली. फॉरेन्सिक आणि तांत्रिक पथके घटनास्थळी पोहोचली आहेत. तपासासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत. नक्की काय झाले हे कळल्यावर अधिक माहिती दिली जाईल," असे शाहपूरवाड यांनी सांगितले.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिमा या गेल्या 4 वर्षांपासून बंगळुरू शहरात काम करत होत्या. त्यामुळे इथे त्या एकट्याच राहत होत्या. गळा दाबून व गळा चिरल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. प्रथमदर्शनी असे दिसते की घरातून कोणतेही दागिने किंवा इतर मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या नाहीत. जेव्हा प्रतिमा यांनी त्यांच्या मोठ्या भावाने केलेल्या फोन उत्तर दिले नाही, तेव्हा तो तिला शोधण्यासाठी त्यांच्या  घरी गेला होता. त्यावेळी प्रतिमा मृतावस्थेत सापडल्या. त्यांच्या भावाने पोलिसांना माहिती दिली.


मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश


दरम्यान या प्रकरणाची मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दखल घेतली आहे. 'मला नुकतीच ही माहिती मिळाली आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करू. असे दिसते की ती घरी एकटीच राहत होती, तर तिचा नवरा त्याच्या गावात राहतो. हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आम्ही या प्रकरणाची चौकशी करू, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटलं. माध्यमांच्या वृत्तानुसार मृत प्रतिमा यांचा पती शिवमोग्गा जिल्ह्यातील तीर्थहल्ली येथे राहतो.