बंगळुरू: कर्नाटकमधील राजकीय नाट्याने गुरुवारी आणखी एक नवे वळण घेतले. काँग्रेस आणि जेडीएसच्या बंडखोर आमदारांनी बंगळुरूत विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांची भेट घेतली. या सगळ्या घडामोडीनंतर काँग्रेस-जेडीएसकडून आमदारांसाठी व्हीप जारी करण्यात आला. कर्नाटक सरकारचे मुख्य प्रतोद गणेश हुक्केरी यांनी जारी केलेल्या या व्हीपमध्ये सर्व आमदारांना शुक्रवारी अधिवेशनासाठी उपस्थित राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. यावेळी गैरहजर राहिल्यास संबंधित आमदारांवर पक्षांतर कायद्यानुसार कारवाई होईल, असा इशाराही देण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तत्पूर्वी विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत या सगळ्या वादावर आपली बाजू मांडली. काँग्रेस आणि जेडीएसच्या १३ आमदारांनी माझ्या कार्यालयात योग्यप्रकारे राजीनामा सादर केला आहे. आता मी त्यावर विचार करून निर्णय देईन, असे रमेश कुमार यांनी सांगितले. 


मात्र, मी निर्णय प्रक्रियेसाठी वेळ लावत असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. या बातम्यांमुळे मी व्यथित झालो आहे. राज्यपालांनी या प्रकरणाबाबत ६ जुलै रोजी मला माहिती दिली. त्यावेळी मी कार्यालयात होतो. मात्र, त्यानंतर मला वैयक्तिक कामासाठी बाहेर जावे लागले. परंतु, दरम्यानच्या काळात एकाही बंडखोर आमदाराने भेटीसाठी वेळ मागितली नव्हती. 


आमदार माझ्याशी न बोलता थेट राज्यपालांकडे आणि तेथून थेट सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने मला निर्णय घेण्यास सांगितले आहे. माझ्याकडे सर्व घटनांची व्हिडिओग्राफी आहे आणि ती मी न्यायालयाला पाठवणार आहे. मी संविधानाच्या चौकटीत राहून निर्णय घेईन, असे के. आर. रमेश कुमार यांनी सांगितले.