बंगळुरू : कर्नाटक विधानसभेत संत्तासंघर्ष चांगलाच शिगेला पोहचलाय. कर्नाटक विधानसभेमध्ये आज शह-काटशह रंगले. विश्वादर्शक ठरावाचं मतदान टाळण्याचा काँग्रेसचा प्रयत्न यशस्वी झाला खरा, मात्र आता राज्यपाल वजुभाई वाला यांनी शुक्रवारी दुपारी १.३० वाजता बहुमत सिद्ध करण्याचे आदेश मुख्यमंत्री कुमारस्वामींना दिलेत. त्यामुळं आता कुमारस्वामी सरकारचं भवितव्य शुक्रवारी निश्चित होण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षांनी गुरूवारचं कामकाज तहकूब करून विश्वास दर्शक ठरावावर शुक्रवारी मतदान घेण्याचा निर्णय घेतला. तर भाजपानं गुरुवारीच विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्याचा आग्रह धरला.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा अध्यक्षांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी गुरुवारचा दिवस निश्चित केला होता. परंतु, सायंकाळी सदन एका दिवसासाठी स्थगित करण्यात आलं. यामुळे भाजप नेते चांगलेच भडकलेत. गुरुवारीच फ्लोअर टेस्ट घेतली जावी, असा आग्रह त्यांच्याकडून करण्यात आला. राज्यपालांनीदेखील अध्यक्षांना गुरुवारीच बहुमत सिद्ध करण्यावर विचार करण्याचा सल्ला दिला होता. परंतु, सदन स्थगित झाल्यानंतर भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांसह विधानसभेतच धरणं आंदोलन सुरू केलंय. हे आंदोलन रात्रभर सुरू राहणार आहे. भाजपाचे आमदार चादरी, उशा घेऊन विधानसभेत पोहोचले असून, रात्री ते तिथंच मुक्काम करणार आहेत.



दरम्यान भाजप आमदार तसंच विरोधी पक्षाचे नेते बी एस येडियुरप्पा यांच्याशी चर्चा करण्याचा काँग्रेस आमदार डीके शिवकुमार आणि एच एस पाटील यांचा प्रयत्न निष्फळ ठरला. भाजप नेते येडियुरप्पा यांच्या दाव्यानुसार, सत्ताधारी पक्षाकडे केवळ ९८ आमदार आहेत तर भाजपकडे १०५ सदस्य आहेत. दुसरीकडे भाजपनं आपल्या आमदारांचं अपहरण केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.