Karnataka Election 2023: कर्नाटकच्या प्रचारतोफा आज थंडावणार, भाजप, काँग्रेस आणि जेडीएसचं भवितव्य पणाला
Karnataka Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज प्रचार तोफा थंडावणार आहेत. येत्या दहा मे रोजी कर्नाटकात मतदान होणार असून निवडणूक आयोगासह सर्व पक्ष सज्ज झाले आहेत.
Karnataka Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 10 मेला मतदान होणार असून आज प्रचारतोफा थंडावणार आहेत. कर्नाटकात यावेळी भाजपा (BJP), काँग्रेस (Congress) आणि जेडिएस (JDS) या तीन पक्षात थेट लढत आहे. त्यामुळे तीन पक्षांनी प्रचारात आपली पूर्ण ताकद लावली होती. तीन पक्षाचे प्रमुख नेते गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकात तळ ठोकून होते. प्रचारसभा आणि रॅलींनी संपूर्ण कर्नाटक पिंजून काढण्यात आलं आहे. दक्षिण भारतात भाजपकडे एकमेव कर्नाटक राज्य असून इथे आपली सत्ता टिकण्यासाचा त्यांचा प्रयत्न असेल.
दुसरीकडे भाजपाकडून सत्ता खेचून घेण्यासाठी काँग्रेसनेही जोर लावला आहे. कर्नाटक विधानसभेच्या माध्यमातून 2024 साठी आपली स्थिती मजबूत करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. तर माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा (HD Deve Gowda) यांच्या नेतृत्वात जनता दलानेही (सेक्यूलर) आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. निवडणूकीच्या आधी ओपिनियन पोलमध्ये (Opinion) कोणत्या पक्षाला बहुमत दाखवण्यात आलेलं नाही, त्यामुळे जनता दलाचं महत्त्व वाढणार आहे. पण जनता दलाला किंगमेकर नाही तर सर्वाधिक जागा जिंकत प्रमुख पक्ष म्हणून काम करायचं आहे. भाजपातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी, डबल इंजीन सरकार, राष्ट्रीय मुद्दे आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांवर प्रचारात भर दिला आहे. तर काँग्रेसकडून स्थानिक प्रश्नांचा मुद्दा उचलून धरण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदी यांनी 29 एप्रिलपासून आतापर्यंत कर्नाटकात 18 जनसभा आणि सहा रोड शो केले आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याआधी पीएम मोदी यांनी जानेवारी ते एप्रिलदरम्यान सात वेळा कर्नाटकाचा दौरा केला आहे, तसंच विविध सरकरी योजनांचं लोकार्पण आणइ शिलान्यास केला आहे. पीएम मोदी यांच्या दौऱ्याने कर्नाटकातील भाजप नेते आणि कार्यकर्त्यांचं मनोबल कमालीचं उंचावलं आहे.
दुसरीकडे कर्नाटक विधानसभा जिंकून या वर्षाअखेरीस होणाऱ्या मध्यप्रदेश, छत्तीगड आणि राजस्थान विधानसभा निवडणूकीत नव्या उत्साहाने उतरण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल. काँग्रेसने सुरुवातीपासूनच नेते सिद्धरमैया (Siddaramaiah) आणि डी के शिवकुमार (D K Shivkumar) यांच्याअवतीभोवती प्रचाराची भूमिका ठेवली आहे. यातच काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Ghandhi), राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) स्वत: प्रचाराच्या मैदानात उतरल्याने काँग्रसला नव बळ मिळाल्याचं बोललं जातंय.
महाराष्ट्रातल्या नेत्यांचाही प्रचार
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कर्नाटकच्या प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टीका केलीय. 'राष्ट्रवादी हा साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष आहे' कर्नाटकात काय डोंबलं करणार? हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. तर शरद पवारांनीही फडणवीसांना एकाच वाक्यात प्रत्युत्तर दिलंय. 'सगळ्या खोलात तिथं बोलायचं, इथं नाही' निपाणीत जाऊनच उत्तर देऊ असं पवारांनी म्हटलंय. दुसरीकडे कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरेंनीही मतदारांना आवाहन केलंय. कोणत्याही पक्षाच्या मराठी उमेदवारालाच मत द्या. आणि त्याने निवडून आल्यावर मराठी भाषेची सुरु असलेली गळचेपी, मराठी माणसांवर सुरु असलेला वर्षानुवर्षांचा अन्याय याविरोधात तिथल्या विधानभवनात वाचा फोडायलाच हवी. असं आवाहन राज ठाकरेंनी केलंय.
राहुल गांधींनी वेधलं लक्ष
कर्नाटक निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीतही राहुल गांधींच्या कृतीनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. राहुल गांधींनी आज बंगळुरु महापालिका परिवहन सेवेच्या बसमधून प्रवास केला. खचाखच भरलेल्या बसमध्ये राहुल गांधी आल्याचं पाहून प्रवाशांनाही आश्चर्य वाटलं. प्रवाशांनीच उभे असलेल्या राहुल गांधींना सीटची ऑफर दिली. त्यानंतर प्रवाशांसोबत गप्पाही रंगल्या. तर काल राहुल गांधींनी एका फूड डिलिव्हरी बॉयच्या स्कूटरवरुन प्रवास केला होता. सुमारे दोन किलोमीटरपर्यंत डिलिव्हरी बॉयच्या स्कूटरवरुन प्रवास करत ते त्यांच्या हॉटेलपर्यंत गेले..