Karnataka Election 2023: प्रियंका गांधी नमाज पठण करतात, मी त्यांना एकदा....; स्मृती इराणी यांचा मोठा दावा
Karnataka Election 2023: जे नमाजचं (Namaz) पठण करतात ते मंदिर बांधत नाहीत असं म्हणत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्यावर निशाणा साधला आहे. यावर काँग्रेसनेही (Congress) त्यांना उत्तर दिलं असून आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंकडे लक्ष द्या असं म्हटलं आहे.
Karnataka Election 2023: केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेत्या स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी काँग्रेसच्या महसचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्याबद्दल मोठं विधान केलं आहे. आपण प्रियंका गांधी यांना नमाज (Namaz) पठण करताना पाहिलं असल्याचा दावा स्मृती इराणी यांनी केला आहे. 2019 लोकसभा निवडणुकीत प्रियंका गांधी अमेठीत राहुल गांधी यांच्यासाठी प्रचार करत असताना आपण त्यांना नमाज पठण करताना पाहिलं होतं असं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी शिवकुमार यांनी जर काँग्रेस सत्तेत आली तर आपणही राज्यात हनुमानाची मंदिरं बांधू असं आश्वासन दिलं आहे. त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना स्मृती इराणी यांनी हे विधान केलं आहे. काँग्रेसने जाहीरनाम्यात राज्यात सत्ता आल्यास जातीय सलोखा बिघडवणाऱ्या बजरंग दल आणि इतर सर्व संघटनांवर बंदी घालण्याचं आश्वासन दिलं आहे. यानंतर भाजपाने त्यांच्यावर टीका केली असून हा हनुमानाचा अपमान असल्याचं म्हटलं आहे.
"शिवकुमार हे मुख्यमंत्री होणार नाही आहेत. त्यामुळे त्यांनी मंदिरं बांधण्यासंबंधी कोणतंही आश्वासन देऊ नये. पण त्यांनी मंदिरं बांधण्याचं आश्वासन देण्याआधी प्रियंका गांधी यांच्याशी चर्चा केली आहे का? याचं कारण 2019 लोकसभा निवडणुकीवेळी अमेठीत मी प्रियंका गांधी यांना रस्त्यावर नमाज पठण करताना पाहिलं होतं," असं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.
जे इस्लामचं पालन करतात ते देवपूजा करत नाहीत किंवा मंदिरं बांधत नाहीत. जेव्हा त्यांचे नेतेच देवपूजा आणि मंदिरं बांधण्याच्या विरोधात आहेत, तेव्हा डी के शिवकुमार मंदिरं बांधण्याचं आश्वासन देऊ शकतात का? अशी विचारणा स्मृती इराणी यांनी केली आहे.
स्मृती इराणी यांच्या टीकेला काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी उत्तर दिलं असून त्या खोटारड्या असल्याचं म्हटलं आहे. "किती दिवस तुम्ही महत्त्वाच्या मुद्द्यांवरुन लोकांचा लक्ष हटवणार आहात. जंतर मंतरवर आपल्या इतक्या मुली आंदोलन करत असतानाही त्याबद्दल देशाच्या महिला आणि बालविकास मंत्री एक शब्दही उच्चारत नाहीत हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे. पण राहुल गांधी किंवा गांधी कुटुंबाबद्दल बोलताना आोरडून बोलतात," अशी टीका त्यांनी केली आहे.
काँग्रेस तुम्हाला या निवडणुकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवरुन लक्ष भरकटवू देणार नाही असं त्या म्हणाल्या आहेत. महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवर भाष्य करा असं त्यांनी म्हटलं आहे.