Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणूक मतदानासाठी काही दिवस बाकी आहेत. निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात 'विषकन्या' आणि 'नालायक मुलगा' असे शब्द वापरले गेले आहेत. त्यामुळे कर्नाटकचे भाजप आमदार बसनगौडा पाटील यत्नाल आणि काँग्रेसचे आमदार प्रियांक खरगे यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाने आपल्या नोटीसमध्ये दोन्ही नेत्यांना आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत उत्तर देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. जर उत्तर समाधानकारक नसेल तर त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 पंतप्रधान मोदी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आदी प्रचारात सक्रीय झाले आहेत. काँग्रेसने कर्नाटकात सरकार आले तर बजरंग दल सारख्या संघटनांवर बंदी घालण्यात येईल, असे जाहीर केले आहे. हाच धागा पकडत पंतप्रधान मोदी यांनी 'बजरंगबली की जय' अशी घोषणा दिली आहे. काँग्रेस बजरंगबली हनुमान यांच्या विरोधात आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे. भाजप आणि काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत असताना दोन्ही राजकीय पक्षांच्या आमदारांकडून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आणि वैयक्तिक टीका केल्याच्या आरोपाखाली नोटीस बजावण्यात आली आहे. 


निवडणूक आयोगाने दोन्ही नेत्यांवर कारवाई का करु नये, याचे स्पष्टीकरण मागितले आहे. कर्नाटकातील विजयपुरा मतदारसंघातील भाजप आमदार यत्नल यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना 'विषकन्या'  म्हटले, तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे चिरंजीव प्रियांक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका सभेत 'नालायक मुलगा' म्हटले आहे.


यत्नल यांनी एआयसीसी अध्यक्षांच्या टीकेवर टीका करत 'विषारी महिला' टिप्पणी केली, ज्यामध्ये काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने पंतप्रधान मोदी यांची तुलना 'विषारी साप'शी केली. वैयक्तिक टीका रोखण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष आणि स्टार प्रचारकांना सूचना दिल्या आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान अनेक नेत्यांनी भाषेच्या शिष्टाईकडे दुर्लक्ष केल्याचे आयोगाने म्हटले होते. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही निवडणूक आयोगाने अधिकाऱ्यांना दिले आहेत.


बजरंगबली वादावर काँग्रेस नेत्याचा भाजपला प्रश्न


काँग्रेस नेते डी.के. शिवकुमार यांनी सांगितले की, मी स्वतः हनुमानाचा भक्त आहे, पण 'बजरंगबली आणि बजरंग दलाचा काय संबंध' हे भाजपने सांगावे. मी हिंदू आहे, भगवान हनुमान आणि रामाचा भक्त आहे. शिवकुमार यांनी आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घालण्याच्या आश्वासनावरुन वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी भगवान हनुमान आणि रामाचा भक्त आहे. भाजपचे नेते फक्त हनुमानाचे भक्त आहेत का? कर्नाटक हे शांततेचे आश्रयस्थान आहे, सामाजिक सलोखा बिघडवून जनतेला त्रास देऊ नये, असे भाजपला टोकले आहे.