कर्नाटकातील सस्पेन्स अखेर संपला! सिद्धरमय्यांकडे राज्याचं नेतृत्व; डी के शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपद
Karnataka Congress: कर्नाटकमध्ये (Karnataka) गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर अखेर कोण मुख्यमंत्री होणार याचा निर्णय झाला आहे. काँग्रेसने (Congress) सिद्धरमय्या (Siddaramaiah) यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं आहे. तसंच डी के शिवकुमार (D K Shivkumar) यांना उपमुख्यमंत्री केलं आहे. याशिवाय त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी कायम राहणार आहे.
Karnataka Congress: कर्नाटकमध्ये (Karnataka) गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर अखेर कोण मुख्यमंत्री होणार याचा निर्णय झाला आहे. काँग्रेसने (Congress) सिद्धरमय्या (Siddaramaiah) यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं आहे. तसंच डी के शिवकुमार (D K Shivkumar) यांना उपमुख्यमंत्री केलं आहे. याशिवाय त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी कायम राहणार आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे. निवडणुकीतील विजयानंतर दोन्ही नेते मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असल्याने दिल्लीत बैठकांचा सिलसिला सुरु होता. या बैठकांना अखेर यश आलं असून सिद्धरमय्या यांच्याकडे सत्तेच्या चाव्या सोपवण्यात आल्या आहेत. दरम्यान, सुरजेवाला यांना यावेळी पाच वर्षांचा कालावधी दोघांमध्ये विभागला जाणार का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की "सत्ता फक्त कर्नाटकच्या जनतेसोबत वाटली जाईल, याशिवाय दुसरं काही नाही".
सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मध्यस्थी केल्यानेच डी के शिवकुमार दुसऱ्या क्रमांकाची जागा स्विकारण्यास तयार झाले आहेत. पक्षाच्या हितासाठी आपण त्याग करत आहोत असं त्यांनी म्हटल्याची सूत्रांची माहिती आहे.
दरम्यान काँग्रेस खासदार आणि शिवकुमार यांचे बंधू डी के सुरेश यांनी आपण आनंदी नसल्याचं म्हटलं आहे. "माझ्या भावाला मुख्यमंत्री व्हायचं होतं. या निर्णयामुळे आम्ही नाराज आहोत," असं ते म्हणाले आहेत.
सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांनी आज सकाळी काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांची भेट घेतली. मुख्यमंत्रीपदावरुन वाद सुरू झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच भेट होती. त्यानंतर दोन्ही नेते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेण्यासाठी गेले. यापूर्वी मल्लिकार्जून खर्गे आणि राहुल गांधी यांनी बुधवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत शिवकुमार यांना दोन ऑफर दिल्या होत्या. परंतु या बैठकीत कोणताही निर्णय झाला नव्हता. डी के शिवकुमार यांनी दोन्ही पर्याय नाकारले होते, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यानंतर संध्याकाळी दुसरी बैठक झाली.
सूत्रांच्या माहितीनुसार, डी के शिवकुमार यांना सध्याच्या जबाबदारीसह राज्याचं उपमुख्यमंत्रीपद ऑफर करण्यात आलं होतं. तसंच त्यांना त्यांच्या आवडीची सहा खाती निवडण्याचं स्वातंत्र्यही देण्यात आलं होतं.
याशिवाय आणखी एक पर्याय होता, ज्यामध्ये शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यात सत्तावाटप केलं जाणार होतं. यानुसार सिद्धरमय्या यांना दोन वर्षांसाठी आणि त्यानंतर शिवकुमार यांना तीन वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद दिलं जाणार होतं अशी सूत्रांची माहिती आहे. पण हा पर्याय स्वीकारण्यास डी के शिवकुमार आणि सिद्धरमय्या दोघांनीही नकार दिला.
दरम्यान, मुख्यमंत्रीपद वाटून घेण्यासंबंधी काही निर्णय झाला आहे का हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र सत्ता विभागून घेतली तर आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कामगिरीवर परिणाम होण्याची भीती आहे.
दुसरीकडे शिवकुमार यांनी बंडखोरीची शक्यता नाकारली आहे. "पक्षाची इच्छा असेल तर ते मला जबाबदारी देऊ शकतात. आमचं एकत्र घर आहे. इथे मला कोणातही फूट पाडायची नाही. त्यांना मी आवडो किंवा न आवडो, मी एक जबाबदार माणूस आहे. मी पाठीवर वार करणार नाही. मी कोणालाही ब्लॅकमेल करणार नाही," असं त्यांनी म्हटलं आहे.