कर्नाटक निवडणूक २०१८ : भाजपकडून `खानमाफिया` रेड्डीच्या कुटुंबाला उमेदवारी
भाजपा आणि बेळ्ळारी इथले खानमाफिया जनार्दन रेड्डी यांचा काडीमात्र संबध नाही, असं भाजापाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी स्पष्ट केलं होतं...
प्रताप नाईक, झी मीडिया, हंप्पी बेळ्ळारी : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे... काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु असतानाच खान घोटाळ्यातील आरोपी आणि भाजपचे माजी मंत्री जनार्दन रेड्डी हे भाजप खासदार श्रीरामलु यांच्यासह अनेक भाजपा उमेदवाराच्या प्रचारात उतरले आहेत... त्यामुळं काँग्रेसचे नेते भाजपला लक्ष करत आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा बेळ्ळारीचा खानमाफिया जनार्दन रेड्डी हा चर्चेत आलाय.
भाजपा आणि बेळ्ळारी इथले खानमाफिया जनार्दन रेड्डी यांचा काडीमात्र संबध नाही, असं भाजापाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी स्पष्ट केलं होतं... असं असल तरी भाजपानं जनार्दन रेड्डी यांचे नातेवाईक आणि इतर सहकाऱ्यांना जवळपास सात ठिकाणी उमेदवारी देवू केली आहे. त्यामुळं काँग्रेस भाजपवर अक्षरश: तुटून पडत आहे. त्यामुळं अमित शाह यांना आपला बेळ्ळारीचा दौरा रद्द करावा लागला होता.
भाजपचे माजी मंत्री आणि खान घोटाळ्यात आरोपी जनार्दन रेड्डी यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. बेळ्ळारी इथं अवैद्य खान उत्खनन करुन सुमारे साडे पाच हजार कोटी रुपयांची लूट केल्याप्रकरणी तत्कालीन कर्नाटकचे लोकायुक्त संतोष हेगडे यांनी जनार्दन रेड्डी यांना दोषी ठरवलं होतं. त्यानंतर जनार्दन रेड्डी याला ४२ महिने जेलमध्ये घालवावे लागेल. त्याचबरोबर २०१६ मध्ये बंगळुरू इथं आपल्या मुलीच्या लग्नात तब्बल ५०० कोटी रुपयांचा चुराडा केला होता. म्हणून इन्कम टॅक्सनंदेखील त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. जनार्दन रेड्डी याचा हा पूर्व-इतिहास असला तरी कर्नाटकमधील भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडीयुराप्पा हे नेहमीच जनार्दन रेड्डी यांची बाजू घेत असताना दिसत आहेत. त्याला कारणंही तसंच आहे. २००८ मध्ये कर्नाटकमध्ये रेड्डी बंधुच्या मदतीनं कर्नाटकमध्ये भाजापाची सत्ता आलेली होती. जनार्दन रेड्डीकडं असणाऱ्या मनी आणि मसल पॉवरचा वापर करुन यंदाही निवडणूक जिंकण्याची व्यूहरचना येडीयुराप्पा यांनी आखलेली दिसते. त्यामुळचं भाजापानं जनार्दन रेड्डी यांचे नातेवाईक आणि इतर संबधितांना भाजापाचं तिकीट देवू केलं आहे.
खानमाफिया आणि भाजपचे माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांच्या कोणत्या नातेवाईकांना आणि संबधितांना कुठून तिकीट दिलंय त्यावर एक नजर टाकुया...
- बेळ्ळारी जिल्ह्यातील हरपनहळ्ळी विधानसभा मतदार संघातून जनार्दन रेड्डी यांचे मोठे बंधु जी करुणाकर रेड्डी हे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवित आहेत.
- बेळ्ळारी सिटी विधानसभा मतदार संघातून जनार्दन रेड्डी याचे दुसरे बंधु जी.सोमशेखर रेड्डी हे भाजपाच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात आहेत.
- बेळ्ळारी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून श्रीरामलु यांचे नातेवाईक आणि माजी खासदार सन्न फकिराप्पा हे निवडणूक रिंगणात आहेत.
- बादामी आणि मळकलमूर या दोन विधानसभा मतदारसंघात भाजापाचे खासदार आणि जनार्दन रेड्डी यांचे जिवलग मित्र श्रीरामलु हे निवडणूक लढवित आहेत.
- कुडेलगी विधानसभा मतदार संघातून जनार्दन रेड्डी यांचे निकटवर्तीय एन.वाय.गोपाळ कृष्णा हे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवित आहेत. एन.वाय.गोपाळ कृष्णा हे यापुर्वी सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
- कंपाळी विधानसभा मतदार संघातून खासदार श्रीरामलु यांचा भाचा सुरेश बाबु हे भाजपच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात आहे.
- कर्नाटकमधील गदग जिल्ह्यातील गदग विधानसभा निवडणुकीत श्रीरामलु यांचे निकटवर्तीय अनिल मेनसिनकाई हे उमेदवार आहेत.
- तर कोलार जिल्ह्यातील बाजेपल्ली विधानसभा निवडणुकीत जनार्दन रेड्डी यांचे निकटवर्तीय ऑक्टर साईकुमार हे भाजापाच्या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत.
भाजपनं खाण घोटाळ्यातील आरोपी जनार्दन रेड्डडी यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देवू केल्यानंतर काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार सिद्धरामय्या आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार येडीयुराप्पा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर जोरदार टीका सुरु केलीय. मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे तर सोशल मीडियाच्या माध्यमातून तुटून पडले आहेत. काँग्रेसच्या या आक्रमक पवित्र्यामुळं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना आपला नियोजित बेळ्ळारी दौरा रद्द करावा लागला होता. भाजापानं जनार्दन रेड्डी यांच्या संबधितांना तिकिट देवू केलं असलं तरी काँग्रेसनंदेखील बेळ्ळारीमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या काही उमेदवारांना तिकीट देवू केलं हे वास्तव आहे.
जनार्दन रेड्डी यांना भाजपानं यापूर्वीच पक्षातून काढून टाकलं आहे. तरीदेखील जनार्दन रेडड्डी हे भाजपा उमेदवाराच्या निवडणूक प्रचारात दिसत आहेत. इतकच नव्हे तर, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंगा रेड्डी यांचा पराभव करण्यासाठी भाजापाच्या काही नेत्यांनी जनार्दन रेड्डडी विडा दिल्याची चर्चा आहे... त्यामुळं कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अखरेच्या टप्यात चांगलीच रंगत आली आहे. पण जनार्दन रेड्डी यांच्या एन्ट्री भाजपाला अवघड जागीच दुखने ठरु लागलं आहे.
कर्नाटकच्या राजकारणात खानमाफिया जनार्दन रेड्डी यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. त्यामुळेच भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार येडीयुराप्पा नेहमी खानमाफिया जनार्दन रेड्डी यांची बाजू घेत असताना दिसून येत आहेत. त्यामुळं याचा फायदा भाजपला होणार की नाही हे आपल्याला निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल.