बंगळुरू: कर्नाटक विधानसभेतील शक्तीपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी बंगळुरूतील वातावरण प्रचंड तापले आहे. यावेळी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन बंडखोर आमदारांवर टीकास्त्र सोडले. त्यांनी म्हटले की, २५ कोटी, ३० कोटी, ५० कोटी रुपये देऊन आमदारांची खरेदी करण्यात आली. हा सगळा पैसा कुठून येत आहे? या बंडखोर आमदारांना आम्ही अपात्र ठरवू. त्यांच्या राजकीय समाधी बांधली जाईल, असा इशारा सिद्धरामय्या यांनी दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१३ सालापासून पक्ष बदलणाऱ्या आमदारांना कायम पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आताही राजीनामा देणाऱ्या आमदारांची तीच गत होईल. आमदारांची घाऊक खरेदी ही चिंताजनक गोष्ट आहे. यापूर्वी एक किंवा दोन आमदार फुटायचे. ती गोष्ट इतकी गंभीर नव्हती, असे सिद्धरामय्या यांनी सांगितले. त्यामुळे यापुढे बंडखोर आमदारांना काँग्रेस आणि सेक्युलर जनता दलाचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत. त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश दिला जाणार नाही, असेही सिद्धरामय्या यांनी सांगितले. 




दरम्यान, कर्नाटक विधानसभेत काहीवेळापूर्वीच विश्वासदर्शक ठरावावरील मतदानाला सुरुवात झाली आहे. यापूर्वी विधानसभेचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले. त्यामुळे आता थोड्यावेळात एच.डी.कुमारस्वामी यांचे सरकार राहणार की जाणार, हे स्पष्ट होईल.