जोडप्याच्या `मोबाईल चॅट`मुळे इंडिगोच्या विमानाला 6 तास उशीर, जाणून घ्या काय आहे प्रकरण
रविवारी दुपारी मंगळुरू-मुंबई विमानामध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला
Flight Delayed : रविवारी दुपारी मंगळुरू-मुंबई विमानामध्ये (mangalore to mumbai flight) हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. यामुळे विमान नियोजित वेळेपेक्षा 6 तास उशिराने उड्डाण केले. या विमानातून जाणाऱ्या एका महिला प्रवाशाने दिलेल्या माहितीनंतर या विमानाचे उड्डाण थांबवण्यात आले होते.
या महिलेने तिच्यासोबत प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीच्या मोबाईलवर संशयास्पद मेसेज आल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाला दिली. या माहितीनंतर पोलीस आणि विमानतळ प्राधिकरणाने सतर्क होत सर्व प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आले. त्यानंतर बराच वेळ तपासणीची प्रक्रिया सुरू होती.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
रविवारी मंगळुरू ते मुंबई फ्लाइट क्रमांक 6E5347च्या सीट क्रमांक 13B वर बसलेला दिपायन मांझी त्याची मैत्रिण सिमरन टॉमसोबत व्हॉट्सअॅपवर (Whatsapp) चॅटिंग करत होता. त्यावेळी सिमरन मंगळुरू विमानतळाच्या लाउंजमध्ये बंगळुरूला जाणाऱ्या फ्लाइटची वाट पाहत बसली होती. दीपयनचे विमान टेक ऑफ करायला तयार होते.
दरम्यान, दीपयनच्या व्हॉट्सअॅप चॅटिंगवर त्याच्या शेजारी बसलेल्या एक महिला सहप्रवाशाची नजर पडली. या चॅटमध्ये महिलेने‘तू बॉम्बर आहेस’(you are a bomber) असा मेसेज वाचला. हे पाहून महिला तात्काळ आपल्या जागेवरून उठली आणि केबिन क्रूला कळवले आणि काहीतरी अनुचित प्रकार घडण्याची भीती व्यक्त केली.
केबिन क्रूने तात्काळ कारवाई करत काही वेळातच होणारे उड्डाण थांबवले. त्यानंतर विमान आयसोलेशन बेमध्ये नेण्यात आले आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी पोहोचले. प्रत्येक प्रवाशाला बाहेर काढून त्याचे संपूर्ण सामान तपासण्यात आले.
सुमारे 6 तासांच्या तपासणीनंतरही काहीही सापडले नाही, तेव्हा विमान रवाना झाले, परंतु दीपयन आणि सिमरन या दोघांनाही अडवण्यात आले. दोघांना चॅटबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की ते दोघे एकमेकांना ओळखतात आणि मित्र आहेत. या गप्पांना काही अर्थ नाही. खरं तर ते एकमेकांची चेष्टा करत होते.
या कारणामुळे उड्डाणाला उशीर होत असल्याने आणि उड्डाणाच्या आधी सुरक्षाविषयक सर्व कारवाई पूर्ण झाल्यामुळे, इंडिगो व्यवस्थापनाने पोलिसांना माहिती देणे योग्य वाटले. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सोमवारी दीपयन आणि सिमरन या दोघांनाही चौकशीसाठी मंगळुरू पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. पोलिसांनी चौकशीनंतर दोघांनाही सोडून दिले. या प्रकरणात आणखी काही तथ्यही पोलीस तपासणार आहेत. मात्र आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारची शंका येण्याचे कारण समोर आलेले नाही. पोलिसांनी सांगितले की, दीपयन हा व्यवसायाने इंजिनियर आहे तर सिमरन ही विद्यार्थिनी आहे.