बंगळुरू : 'बिग फॅट इंडियन वेडिंग' असा हॅशटॅग जोडत अनेकजण लग्नसोहळ्यातील बऱेच फोटो, व्हिडिओ पोस्ट करत असतात. सध्या अशाच एका लग्नाची जोरदार चर्चा आहे. हे लग्न आहे एका भाजप नेत्याच्या मुलीचं. हा विवाहसोहळा खास ठरण्यामागचं कारण म्हणजे त्यावर जवळपास तब्बल ५०० कोटींचा खर्च होत असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे अंबानी कुटुंबातील विवाहसोहळ्यांमागोमाग हा पारंपरिक पद्धतीचा लग्नसोहळाही अनेकांना थक्क करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

karnataka कर्नाटकचे आरोग्यमंत्री बी श्रीरामलू  b sriramulu यांच्या मुलीचा हा विवाहसोहळा.  एक, दोन नव्हे तर नऊ दिवस या सोहळ्याची धूम आहे. बी श्रीरामलू यांची मुलगी रक्षिता हिच्या शाही विवाहाचीच सर्वत्र हवा आहे. ९ दिवस बेल्लारी आणि बंगळुरूमध्ये हा सोहळा चालणार आहे. ज्यामध्ये मुख्य सोहळा ५ मार्चला आहे. असं असलं तरीही असला तरी २७ फेब्रुवारीपासूनच या सोहळ्यासाठीचे काही विधी सुरु झाले आहेत. 


हैदराबादमधील उद्योगपती रवीकुमार रेड्डी यांचा मुलगा ललित संजीव रेड्डी याच्यासोबत रक्षिता विवाहबंधनात अडकणार आहे. तिच्या लग्नसोहळ्याला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्यासह तब्बल १ लाख पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. 


पाहा : देवाब्राह्मणाच्या नव्हे, संविधानाच्या साक्षीने अभिनेत्याने बांधली लग्नगाठ 


थाटामाटात पार पडणाऱ्या या लग्नाची आमंत्रणपत्रिकाही तितकीच खास. पत्रिकेसाठी सार्वजनिक आरोग्याची थिम वापरण्यात आली आहे. पत्रिकेसोबत हळदी-कुंकू, केशर आणि वेलचीही वाटण्यात आली आहे. 



बंगळुरूच्या पॅलेस ग्राऊंडमध्ये तब्बल ४० एकर जागेवर मुख्य विवाहसोहळा होणार आहे. प्रत्येक विधीसाठी वेगवेगळ्या थीमवर आधारित मंडप उभारण्यात आले आहेत.  मुख्य लग्नसोहळ्याकरता कर्नाटकमधील प्रचंड लोकप्रिय आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या हम्पी येथील विरूपाक्ष मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. त्यावर फुलांची आरास करण्याचं कामही सुरू असून या कामासाठी तब्बल २०० कामगार मेहनत घेत आहेत. एकिकडे लगीनघाई शेवटच्या टप्प्यात आलेली असतानाच बेल्लारीमध्ये श्रीरामलू यांच्या या निवासस्थानीही काही विधी सुरू आहेत.


२०१६मध्ये बेल्लारीचेच खाणसम्राट, भाजप नेते जी जनार्दन रेड्डी यांच्या मुलीचा विवाह सोहळाही असाच शाही झाला होता. त्या सोहळ्याला तब्बल ५०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. तेव्हा हा सारा थाट पाहता, खरंच हे लग्न साऱ्या देशात चर्चेचा विषय नेमकं का ठरत आहे याचंही उत्तर मिळत आहे. 


((रेड्डींच्या घरच्या लग्न सोहळ्याचे फोटो निनाद झारे यांनी टिपले आहेत))