Tobacco Ban : कर्नाटकमधल्या सिद्धारमैया सरकारने (Karnataka Government) मोटा निर्णय घेतला आहे. सरकारने राज्यात हुक्का बारवर पूर्णपणे बंदी (Hookah Bar Ban)घातली आहे. याशिवाय तंबाखूजन्य उत्पादनांच्या खरेदी-विक्रीसंदर्भातील कायदा आणखी कठोर केला आहे. कर्नाटक विधानसभेत बुधवारी COTPA अॅक्ट म्हणजे सिगारेट आणि तंबाखूच्या विक्रीशी संबंधित कायद्यात सुधारणा केली आहे. सुधारित विधेयक विधानसभेने मंजूर केलं आहे. नव्या कायद्यानुसार नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर शिक्षा आणि आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या नियमांची अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. लोकांच्या आरोग्याचं रक्षण करण्यासाठी आणि तंबाखूजन्य आजारांना प्रतिबंध करण्यासाठी या कायद्यात सुधारणा करण्यात आल्याचं अधिसूचनेत म्हटलं आहे.


काय-काय बदलणार
- हुक्का बारवर बंदी : हे विधेयक संमत झाल्यानंतर आता राज्यात हुक्का बारवर पूर्णपणे बंदी घालण्यात येईल. हुक्का बार चालवण्यावर कारवाई केली जाईल.


- सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान  : राज्यात आता सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यावरही बंदी असेल.


- 21 वर्ष वयोमर्यादा :  आतापर्यंत तंबाखूजन्य पदार्थ खरेदीचे कायदेशीर वय 18 वर्ष होतं.  ही वयोमर्यादा 21 वर्षे करण्यासाठी विधेयकात सुधारणा करण्यात आली आहे. म्हणजेच 21 वर्षांखालील कोणालाही सिगारेट किंवा तंबाखू विकता येणार नाही.


- या ठिकाणी बंदी : शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, बालसंगोपन केंद्रे, आरोग्य केंद्रे, मंदिरे, मशिदी आणि उद्यानांजवळ तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी असेल. अशा ठिकाणांच्या 100 मीटरच्या परिघात सिगारेट किंवा तंबाखूची विक्री करण्यास मनाई असेल.


कठोर कारवाईची तरतूद
सुधारित कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. प्रतिबंधित जागेत 21 वर्षाखालील तरुणांना तंबाखू किंवा सिगारेट विकणाऱ्यांकडून 1000 रुपये दंड वसूल केला जाणार आहे. याशिवाय हुक्का बार चालवणारा दोषी आढळल्यास 1 ते 3 वर्षांच्या शिक्षेची तरतुद करण्यात आली आहे. याशिवाय 50 हजार ते 1 लाख रुपयांचा आर्थिक दंडही वसूल केला जाणार आहे. 


हुक्का पार्लरवर बंदी का?
हुक्का पार्लरवर बंदी घालण्याची सरकार अनेक दिवसांपासून तयारी करत आहे.  एका अभ्यासानुसार 45 मिनिटे हुक्का पिणे म्हणजे 100 सिगारेट पिण्याइतके आहे. याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. जागतिक आरोग्य संघटना (WHO) च्या मते हुक्का ही एक नशा आहे, ज्यामध्ये निकोटीन किंवा तंबाखू आणि चव वाढवणारे रासायनिक कार्बन मोनोऑक्साइड असतं आणि ते आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. कर्नाटकात हुक्का बार चालवणाऱ्यांवर दरवर्षी डझनभर गुन्हे दाखल होतात. आकडेवारीनुसार, 2020 मध्ये 18, 2021 मध्ये 25 आणि 2022 मध्ये 38 गुन्हे हुक्का बार चालकांविरुद्ध नोंदवण्यात आले आहेत.