150 फोन, 230 किमी प्रवास अन् पत्नीची माहेरात हत्या; पोलीस हवालदाराचे हादरवणारं कृत्य
Karnataka Crime : कर्नाटकात एका पोलीस हवालदाराने पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. पत्नीची हत्या करण्याआधी आरोपी पोलीस हवालदाराने कीटकनाशक प्यायले होते.पोलिसांनी याप्रकरणात अधिक तपास सुरु केला आहे.
Crime News : कर्नाटकच्या (Karnataka Crime) बंगळुरुमध्ये एका पोलीस हवालदाराने त्याच्या पत्नीची तिच्या माहेरी जाऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर पोलीस हवालदारानेही आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पत्नीचा मृत्यू झाला असून पतीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे आरोपी पोलीस हवालदाराच्या पत्नीने 11 दिवसांपूर्वीच एका बाळाला जन्म दिला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Karnataka Police) घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरु केला आहे.
पत्नीचे प्रेमसंबंध असल्याचा संशय घेऊन कर्नाटकातील या पोलीस हवालदाराने 230 किलोमीटर प्रवास करून सासरी जाऊन पत्नीचा गळा दाबून खून केला. खून करण्यापूर्वी हवालदाराने कीटकनाशक प्यायले होते. हवालदाराला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. मृत महिलेने 11 दिवसांपूर्वीच बाळाचा जन्म दिला होता. या घटनेनंतर दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
किशोर डी असे आरोपी पतीचे नाव आहे. किशोरला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्याची पत्नी सध्या आई-वडिलांच्या घरी राहत होती. अवघ्या 11 दिवसांपूर्वी तिने बाळाल जन्म दिला होता. किशोर डी याने 24 वर्षीय पत्नीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला होता. त्यामुळे ती माहेरी राहायला आली होती. पत्नीने किशोरचे फोन उचलणेही बंद केले होते. सोमवारी किशोरने पत्नीला तब्बल 150 वेळा फोन केला. पत्नीने फोन न उचलल्याने त्यांचा संयम सुटला. किशोर चामराजनगर शहरापासून 230 किलोमीटरचा प्रवास करून पत्नीच्या घरी आला. घरात शिरताच त्याने कीटकनाशक पिऊन पत्नीचा गळा आवळून खून केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोरचे लग्न 13 नोव्हेंबर 2022 रोजी झाले होते. किशोर हा कोलार जिल्ह्यातील वीरपुरा येथील रहिवासी आहे. किशोरला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे तो रोज तिचा मोबाईल तपासत असे. आपल्या पत्नीशी मेसेज करणाऱ्या किंवा बोलणाऱ्या प्रत्येकावर तो प्रश्न विचारत होता. पत्नी तिच्या काही कॉलेजच्या मित्रांसोबत फिरायची असाही आरोप किशोरने केला होता.
दरम्यान, रविवारी संध्याकाळी किशोरने पत्नीला फोन करून काही कारणावरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मुलगी रडत असतानाच तिच्या आईने फोन कट केला. तिने मुलीला रडू नको असे सांगितले. तसेच किशोरचा फोन देखील उचलू नको असे सांगितले. त्यानंतर सोमवारी किशोरने पत्नीला दीडशे वेळा फोन केला. पत्नीने याची माहिती पालकांना दिले. त्यानंतर किशोर संध्याकाळी पत्नीच्या घरी पोहोचला आणि त्याने पत्नीची गळा आवळून हत्या केली.