नवी दिल्ली :   मुंबईत गर्दी पाहता पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिला. तर दिल्लीतही लॉकडाऊन पुन्हा लागू करण्याचा विचार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल करत आहेत. मुंबई, दिल्लीत लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर होणारी गर्दी आणि कोरोनाबाधितांची वाढती संख्या यामुळे सरकारपुढे पुन्हा लॉकडाऊन करण्याशिवाय गत्यंतर नसल्याचं दिसायला लागलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊनचे चार टप्पे झाल्यानंतर देशभरात अनलॉकचा पहिला टप्पा सुरु करण्यात आला. त्यात प्रमुख रेल्वे सेवा आणि मेट्रो सेवा बंद ठेवल्याने सगळा भार सार्वजनिक बस वाहतूक आणि रस्ते वाहतुकीवर येऊ लागला आहे. त्यातून सोशल डिस्टसिंगचे तीन-तेरा वाजत असून कोरोना पसरण्याची भीतीच अधिक आहे. जी गत मुंबईची तीच स्थिती दिल्लीत होऊ लागली आहे. त्यामुळे दिल्लीतही लॉकडाऊन पुन्हा लागू करण्याचा विचार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल करत असून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी त्याबाबत चर्चाही केली.


दिल्लीत कोरोनाबाधितांची संख्या ३२ हजारांवर पोहचली आहे. गेल्या २४ तासांत १५०० नवे रुग्ण दिल्लीत आढळून आले. दिल्लीत आतापर्यंत कोरोनामुळे ९८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


दिल्लीत गेल्या सात दिवसांत ९५०० रुग्ण आढळून आले आहेत. लॉकडाऊन उठवल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत दिल्लीत साडेपाच लाखांपेक्षा अधिक रुग्ण असतील असा अंदाज आहे. त्यामुळे कोरोना रोखायचा असेल तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, असं केजरीवाल सरकारला वाटत आहे.



दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रायव्हेट हॉटेल, बँक्वेट हॉल, स्टेडियमचा वापर क्वारंटाईन सेंटर आणि कोविड सेंटरसाठी केला जाऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.