Kerala Doctor Suicide: केरळमध्ये एका 26 वर्षीय डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. हुंड्यामुळे लग्न तुटल्याने 26 वर्षीय महिला डॉक्टरने आत्महत्या केली. पोलीस अधिकाऱ्यांनी वर आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी बुधवारी महिला आणि बालविकास विभागाला डॉक्टरच्या आत्महत्येची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलाच्या कुटुंबियांनी मुलीच्या कुटुंबीयांकडून 150 पौंड सोने, बीएमडब्ल्यू कार आणि 15 एकर जमिनीची मागणी करण्यात केल्याचे म्हटलं जात आहे. मुलाच्या मागण्या पूर्ण न त्याच्या कुटुंबीयांनी लग्न मोडले. त्यामुळे समाजात बदनामी होईल या भीतीने डॉक्टर तरुणीने आत्महत्येचा मार्ग स्विकारला. 5 डिसेंबर रोजी तिरुअनंतपुरममधील एका खोलीमध्ये ही तरुणी मृतावस्थेत आढळून आली होती. आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी एका निवेदनात म्हटले की, हुंड्यासंबंधीचे आरोप समोर आल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले होते ज्यामुळे ही आत्महत्या झाली. महिला व बालविकास विभागाच्या संचालकांना तपास करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्याचे जॉर्ज यांनी सांगितले.


आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव शहाना असून तिने मेडिकल कॉलेजच्या सर्जरी विभागातून पोस्ट ग्रॅज्युएशन केले होते. या प्रकरणी पोलिसांनी मेडिकल पीजी असोसिएशनचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. रुवैज ईए यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुवाईज आणि शहाना यांचे लग्न ठरले होते. मात्र नंतर रुवाईजच्या कुटुंबाने शहानाच्या घरच्यांकडे जबरदस्त हुंड्यांची मागणी केली. पण त्याआधीच शहानाच्या कुटुंबीयांनी 50 पौंड सोने, 50 लाख रुपयांची मालमत्ता आणि एक कार देण्याचे मान्य केले होते. मात्र, मुलाच्या कुटुंबीयांनी ऐकलं नाही आणि लग्न मोडलं. त्यामुळे शहाना नैराश्यामध्ये गेली होती.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहानाने भूल देण्याच्या औषधाचा जास्त डोस घेऊन आत्महत्या केली. शहानाच्या फ्लॅटमध्ये एक सुसाइड नोट देखील सापडली होती. पोलिसांनी जप्त केलेल्या नोटमध्ये "प्रत्येकाला फक्त पैसा हवा आहे" असे लिहीले होते.


दरम्यान, शहाना सोमवारी शस्त्रक्रियेसाठी आयसीयूमध्ये रात्र पाळीसाठी जाणार होती. मात्र ती रुग्णालयात पोहोचलीच नाही. तिच्या मैत्रिणीने फोन केला असता तिने उचलला नाही. त्यानंतर तिचे काही मित्र तिच्या फ्लॅटवर पोहोचले असता त्यांना दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता ती आत बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.