धक्कादायक ! सहप्रवशांवर पेट्रोल टाकत लावली आग, धावत्या रेल्वेतून लहान मुलासह महिलेनं मारली उडी, तिघांचा मृत्यू
दोन प्रवाशांमध्ये आपापसात झालेल्या भांडणात एका प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशावर थेट पेट्रोल फेकत आग लावली. धावत्या रेल्वेत घडलेल्या या घटनेने रेल्वेत एकच खळबळ उडाली. या घटनेत एका लहान मुलीसह तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
Fire incident in train : एका माथेफिरूने चालत्या रेल्वेत सह प्रवाशांवर पेट्रोल टाकून आग लावली (Fire Incident in Train). यात तीन जणांचा मृत्यू झाला असून 8 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत (3 Dead in Train). केरळच्या कोझिकोडमध्ये (Kerala Train Fire) ही धक्कादायक घटना घडली आहे. कोझिकोड (Kozhikode) जिल्ह्यातल्या एलाथुर रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली. या घटनेत एका लहान मुलासह महिला आणि एका व्यक्तीचा मृत्यू झाला. रेल्वे ट्रॅकवर या तिघांचे मृतदेह सापडले. घटनास्थळी केरळ पोलीस आणि फॉरेन्सिक पथक (Forensic Team) दाखल होत तपास सुरु करण्यात आला. महिला आणि लहान मुलगी मत्तनूरमधली रहिवासी असून रहमथ असं महिलेचं नाव आहे. तर मृत दोन वर्षांच्या मुलीचं नाव नौफल असं आहे. मृत नौफल ही रहमथच्या बहिणीची मुलगी असल्याची माहिती आहे.
काय आहे नेमकी घटना?
आगीची घटना अलाप्पुझा ते कन्नूर जाणाऱ्या एक्स्प्रेसच्या (Alappuzha Kannur Executive Express) पहिल्या बोगीत ही घटना घडली. आरोपी प्रवाशाचं काही सह प्रवाशांबरोबर भांडण झालं. यामुळे संतापलेल्या आरोपीने सह प्रवाशांवर पेट्रोल टाकत आग लावली. त्यामुळे बोगीत अचानक आग लागली. आग भडकत गेली, त्यामुळे घाबरलेल्या रहमथने दोन वर्षांचया नौफलस चालत्या रेल्वेतून उडी मारली. त्यांच्याशिवाय आणखी एका प्रवाशाने चालत्या रेल्वेतून उडी मारली. रेल्वे वेगात असल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला.
आरोपीविरोधात तक्रार दाखल
पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे. आगीत बोगीतील 8 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अलाप्पुझा ते कन्नूर एक्स्प्रेसमध्ये रविवारी रात्री 9.45 वाजा ही घटना घडली. रेल्वेने कोझिकोड शहर पार केल्यानंतर ही घटना घडली. आग लावल्यानंतर आरोपी रेल्वेतून फरार झाला.
सहप्रवाशांनी रेल्वे थांबवली
रेल्वेला आग लागलेली पाहताच दुसऱ्या बोगीतील प्रवाशांनी चैन खेचत रेल्वे थांबवली आणि जखमींना रुग्णालायत दाखल करण्यात आलं. रेल्वे कन्नूर स्थानकावर आली असता एक महिला आणि एक मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. बोगीत बेपत्ता महिलेचा मोबाईल आणि लहान मुलीचे बूट आढळले.
मिळालेल्या सामानाच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला असता इलाथुर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर रेल्वे ट्रॅकवर महिला आणि लहान मुलीचा मृतदेह आढळला. याशिवाय आणखी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून त्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही.