कोझीकोड : दुबईवरून भारतात येणाऱ्या विमानाचा केरळच्या कोझीकोडमधल्या विमानतळावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये १४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १२३ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी १५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. एयर इंडियाचं A737 बोईंग हे विमान रनवेवर घसरलं आणि दरीमध्ये गेलं. 





COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज संध्याकाळी ७.४५ च्या सुमारास लॅण्डिंगच्यावेळी करीपूर विमानतळावर ही दुर्घटना झाली आहे. याप्रकरणी डीजीसीएने चौकशीचे आदेश दिले आहेत. हे विमान रनवेवर लॅण्डिंग केल्यावर दरीमध्ये कोसळलं, त्यामुळे विमानाचे दोन तुकडे झाल्याची माहिती डीजीसीएने दिली आहे. एनडीआरएफची टीम करीपूर विमानतळावर दाखल झाली आहे. 


या विमानामध्ये १७४ प्रवासी, १० लहान मुलं, २ पायलट आणि ५ केबिन क्रू एवढे जण होते. या विमान अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. विमानतळावर सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आणि प्रवाशांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी नेण्यात येत आहे.