शबरीमला यात्रेत १२ वर्षीय मुलीला अडवलं आणि....
वडिलांसह ती दर्शनासाठी पुढे निघाली होती
पंबा : काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या शबरीमला यात्रेत मंगळवारी एका १२ वर्षीय मुलीला यात्रेत पुढे जाऊन भगवान अय्यप्पा स्वामींचं दर्शन घेण्यापासून रोखण्यात आलं. न्यायालयाकडून देण्यात आलेल्या सध्याच्या निकालानुसार २०१८ मधील निर्णयाला स्थगिती नसल्यामुळे कायदेशीररित्या सर्व वयोगटातील महिलांना शबरीमला मंदिरात जाण्याची परवानगी आहे. पण, वास्तवात मात्र वेगळंच चित्र समोर येत आहे.
मुळची पुदुच्चेरी येथील असणारी ही मुलगी एका चमूसह तिच्या वडिलांच्या साथीने दर्शनासाठी पुढे जात होती. तेव्हाच तिला मंगळवारी ११ वाजण्याच्या सुमारास महिला पोलीस अधिकाऱ्यांनी पंबा येथील नियंत्रण कक्षापाशी अडवल्याचं म्हटलं जात आहे. मुख्य मंदिरापासून पाच किमी दूर, यात्रेतील डोंगराळ भागाच्या टप्प्याच्या प्रवेशाजवळच हे नियंत्रण कक्ष आहे.
शबरीमलाच्या वाटेवर निघालेल्या यात्रेकरुंना श्वानाची साथ
सूत्रांच्या माहितीनुसार ऑनलाईन नोंदणीमध्ये म्हणजेच 'virtual queue facility’मध्ये त्या मुलीचं वय १० वर्षे असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. पण, ओळखपत्र तपासलं असता तिचं वय १२ वर्षे असल्याचं स्पष्ट झालं.
काही वाहिन्यांनी यात्रेदरम्यानची दृश्य प्रसारित केली, त्यामध्ये त्या मुलीचे वडील आणि इतर मंडळी यात्रेसाठी पुढे गेले असता तिने रडण्यास सुरुवात केल्याचंही पाहायला मिळालं. आपल्यालाही दर्शनासाठी पुढे जायचं आहे, अशी विनवणीही तिने पोलीसांना केली. दरम्यान, त्या मुलीला दर्शनासाठी पुढे पाठवण्यात आलं नसलं तरीही देवाला अर्पण करण्यासाठीचं ‘irumudikettu’ यात्रेकरुंनी पुढे नेलं. ज्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्यांसह तिला एका वेगळ्या खोलीत ठेवण्यात आलं जेथे तिने वडिल आणि इतर यात्रेकरुंच्या परतण्याची वाट पाहिली.
मुख्य म्हणजे कोणत्याही १२ वर्षीय मुलीला यात्रेदरम्यान अडवल्य़ाचं वृत्त पोलिसांनी झुगारुन लावलं आहे. याविषयी त्यांनी कोणतंही अधिकृत वक्तव्यही केलेलं नाही. पण, मंदिराच्या नियमांनुसार १० ते ५० वर्षे वयोगटातील महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश नसल्याची बाब मात्र त्यांच्याकडून अधोरेखित करण्यात आली.