नवी दिल्ली : चीनच्या ५९ ऍप्सवर बंदी घातल्यानंतर आता मोदी सरकारने ४० वेबसाईट्स बंद केल्या आहेत. या वेबसाईट्स तत्काळ बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सिख्स फॉर जस्टिस या बंदी घातलेल्या संघटनेशी जोडल्या गेलेल्या या ४० वेबसाईट्स आहेत. फुटीरतावादी गटांना पाठिंबा दिल्यामुळे या वेबसाईट्सवर कारवाई करण्यात आली आहे. 


खलिस्तान समर्थक समुहाच्या वेबसाईट्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेतली सिख्स फॉर जस्टिस (एसएफजे) संघटना खलिस्तान समर्थक आहे. युपीए कायदा १९६७ च्या अंतर्गत सिख्स फॉर जस्टिस (एसएफजे) अनधिकृत संघटना आहे. या वेबसाईट्सनी आपला उद्देश साध्य करण्यासाठी समर्थकांच्या नोंदणीसाठी अभियान सुरू केलं होतं, असं गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. इलेक्ट्रॉनिक आणि आयटी मंत्रालयाने या ४० वेबसाईट्सवर बंदी घालण्याची कारवाई केली आहे. 


इलेक्ट्रॉनिक आणि आयटी मंत्रालय भारतात सायबर स्पेसवर लक्ष ठेवण्याचं काम करतं. मागच्यावर्षी गृहमंत्रालयाने एसएफजेवर राष्ट्रविरोधी कारवाया करत असल्याचा आरोप करत बंदी घातली होती. 


एसएफजेने आपला फुटीरतावादी अजेंडा राबवण्यासाठी शीख जनमत घेण्याचा आग्रह धरला. ही संघटना उघडपणे खलिस्तानच्या उद्देशाचं समर्थन करत असल्यामुळे भारताच्या अखंडत्वाला हे आव्हान असल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं.