Surat diamond company: कोणत्याही महिन्याचा पहिला आठवडा उजाडला, की नोकरदार वर्गाला प्रतीक्षा असते ती म्हणजे पगाराची (Salary). महिनाभर केलेली मेहनत आणि अनेकांच्या बाबतीत मन नसतानाही केलेली नोकरी या साऱ्याला प्रोत्साहन देणारा हाच एकमेव विषय असतो. Your Salary has been credited असा मेसेज आला की कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद खुलतो. पण, सध्या मात्र सूरतस्थित एका हिरे उत्पादक कंपनीतील कर्मचाऱ्यांना याच पगारानं धडकी भरवली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी (7 ऑगस्ट 2024) रोजी गुजरातमधील सूरत येथील एकार हिरे उत्पादक कंपनीनं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पॉलिश हिऱ्यांच्या कमी मागणीचं कारण पुढे करत जवळपास 50000 कर्मचाऱ्यांना 17 ते 27 ऑगस्ट या दिवसांमध्ये अर्थात 10 दिवसांच्या कालावधीत सुट्टीवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. किरण जेम्स असं या कंपनीचं नाव असून, त्यांच्या अधिकृत संकेतस्थळानुसार आणि दाव्यानुसार हिरे व्यापारातील ही एक प्रतिष्ठीत कंपनी आहे. 


अध्यक्ष म्हणतात... 


कंपनीच्या अध्यक्षपदी असणाऱ्या वल्लभभाई लखानी यांच्या माहितीनुसार, त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी 10 दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. काही रक्कम वगळता कर्मचाऱ्यांना या दिवसांचा पगार दिला जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. आर्थिक मंदीची स्थिती पाहता नाईलाजानं आपण कर्मचाऱ्यांना सुट्टीवर पाठवत असल्याचं म्हणत या मंदीपुढं आम्ही हात टेकल्याची हतबल झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. 


नैसर्गिक हिऱ्यांचा कमी पुरवठा आणि कंपनीकडून निर्यात केल्या जाणाऱ्या पैलू पाडलेल्या, पॉलिश हिऱ्यांच्या मागणीत आलेली घट या कारणांमुळे कंपनीनं हे पाऊल उचलल्याचं कारण आता समोर येत आहे. 


हेसुद्धा वाचा : MHADA मागेमाग CIDCO Lottery संदर्भात मोठी बातमी; स्वत:चं घर घेण्यासाठी आता...


 


लखानी यांच्या माहितीनुसार सराफा बाजारातील सद्यस्थिती पाहता प्रतिस्पर्धीसुद्धा प्रभावित झाले असले तरीही त्यांनी मौन बाळगलं आहे. कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष स्थितीची जाणीव व्हावी यासाठी आम्ही नाईलाजानं काही कठोर भूमिका घेत आहोत. या कालावधीत कंपनीच्या अनुषंगानं काहीशी मदत होणार असल्याची आशाही त्यांनी व्यक्त केली. 


कोणत्या घटकांमुळे व्यापारावर परिणाम? 


रशिया युक्रेन युद्ध आणि गाझा- इस्रायल यांच्यामध्ये सुरु असणारा संघर्ष या कारणास्तव जागतिक स्तरावरील मागणी प्रभावित झाली असल्याचं कारण सध्या या हिरे व्यापाराऱ्यांनी पुढे केलं आहे. 2022 मध्ये हिरे व्यापाराची आकडेवारी साधारण 2,25,000 कोटी रुपयांच्या घरात होती. आजच्या दिवसाला मात्र हा आकडा 1,50,000 रुपयांवर घसरला आहे ज्यामुळं मागील दोन वर्षांपासून कंपन्यांनी उतरता आलेखच पाहिल्याचं दाहक वास्तव समोर आलं आहे. सूरतमध्ये जवळपास 4000 लहानमोठ्या हिरे पॉलिश करणाऱ्या कंपन्या असून, त्यातून 10 लाख नागरिकांना रोजगाराच्या संधी मिळतात, पण आर्थिक मंदीच्या लाटेचा मारा आता या रोजगाराच्या संधींवरही परिणाम करताना दिसत आहे ही बाब नाकारता येणार नाही.