मुंबई : भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी लिलया पेलणाऱ्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं मंगळवारी देहावसान झालं. त्या ६७ वर्षांच्या होत्या. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांच्यावर काळाचा आघात झाला. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि एक उत्तुंग राजकीय व्यक्तीमत्त्व म्हणून सुषमा स्वराज यांच्याकडे पाहिलं गेलं. पण, यासोबतच एक मैत्रीण, पत्नी आणि आई अशा भूमिकाही त्यांनी सुरेखपणे आणि तितक्याच जबाबदारीने बजावल्या होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे सारा देश हळहळला आहे. यातच त्यांचे पती स्वराज कौशल आणि मुलगी बांसुरी यांच्या दु:खाला परिसीमा नाहीत. सारा देश आज या कुटुंबाच्या बाजूने उभा आहे. सुषमा स्वराज यांच्या निधनापश्चात त्यांच्या असंख्य आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. ज्यामध्ये विरोधी पक्षनेत्यांसोबतचे त्यांचं मैत्रीपूर्ण नातं असो किंवा मग त्यांचं खासगी आयुष्य असो. 


सुषमा स्वराज आणि त्यांचे पती या दोघांनीही देशाच्या राजकारणात मोलाचं योगदान दिलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वराज यांनी अनेकदा त्यांच्या या सुरेख अशा वैवाहिक आयुष्यातील काही प्रसंग सर्वांच्या भेटीला आणले होते. 


सुषमा स्वराज यांचे पती, स्वराज कौशल हे एक प्रसिद्ध वकील आहेत. न्यायालयीन अटी, कलमं आणि तरतुदींचं शिक्षण घेतानाच स्वराज आणि सुषमा यांच्या नात्याला वेगळं वळण मिळत होतं. झी न्यूजने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार चंदीगढमध्ये शिक्षण घेत असताना त्यांची ओळख सुषमा यांच्याशी झाली होती. सुरुवातीला ते दोघंही एकमेकांचे चांगले मित्र होते. वकिलीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते दोघंही सरावासाठी म्हणून दिल्लीला आले. दरम्यानच त्यांच्या मैत्रीचं रुपांतर हे प्रेमात झालं. 
कालांतराने सुषमा यांनी वडील हरदेव शर्मा यांना या नात्याविषयी सांगितलं. आरएसएसशी जोडल्या गेलेल्या शर्मा यांचा या नात्याला सुरुवातीला विरोध होता. पण, अखेर ते या लग्नासाठी तयार झाले आणि सुषमा- स्वराज कौशल यांच्या सहजीवनाला सुरुवात झाली. 



मिझोरमचे राज्यपाल स्वराज कौशल 


१९९९ ते २००४ या कालखंडात स्वराज कौशल यांची संसदेत उपस्थिती होती. याशिवाय मिझोरमचे राज्यपाल म्हणूनही त्यांची वेगळी ओळख होती. सहसा ते प्रसिद्धीपासून दूरच राहण्याला प्राधान्य देतात. वयाच्या ३४ व्या वर्षीच त्यांना ऍडव्होकेट जनरल म्हणून भूषवण्यात आलं होतं. तर, ३७ व्या वर्षी मिझोरमच्या राज्यपालपदी त्यांची नियुक्ती झाली होती. सुषमा स्वराज या करवा चौथच्या दिवशी अनेकदा त्यांच्या पतीसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असत.