मोदींना धक्का देणारे दलित नेते जिग्नेश मेवाणी यांच्याबद्दल जाणून घ्या...
नरेंद्र मोदींचं मूळगाव असलेल्या वडगाम मतदार संघातून अपक्ष उमेदवार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी यांचा विजय झालाय. त्यामुळे भाजपसाठी हा जोरदार धक्का मानला जातोय.
मुंबई : नरेंद्र मोदींचं मूळगाव असलेल्या वडगाम मतदार संघातून अपक्ष उमेदवार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी यांचा विजय झालाय. त्यामुळे भाजपसाठी हा जोरदार धक्का मानला जातोय.
तरुण तडफदार नेतृत्व
केवळ ३६ वर्षांचे मेवाणी हे व्यवसायाने वकील आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे ते संयोजक आहेत. त्यांनी मास कम्युनिकेशनचाही अभ्यास केलाय. काही काळ त्यांनी पत्रकार म्हणूनही काम केलंय.
जिग्नेश यांचा जन्म एका सामान्य कुटुंबातला... त्यांचे वडील नगर निगममध्ये कर्मचारी होते. सध्या ते सेवेतून निवृत्त झालेत. सध्या अहमदाबादच्या दलित बहुल मेघानी नगर भागात राहणाऱ्या जिग्नेश यांचा जन्म मेहसानामध्ये झाला होता. तरुणांचे नेते असलेले जिग्नेश इंग्रजी, गुजराती आणि हिंदी खूप चांगल्या पद्धतीनं बोलू शकतात.
दलित अस्मिता यात्रा
उना गावात गोरक्षकांनी दलितांवर केलेल्या हल्यानंतर मेवाणींच्या नेतृत्वाखाली 'दलित अस्मिता यात्रा' काढण्यात आली होती. या यात्रेला दलितांचा मोठा पाठिंबा मिळाला होता. 'यापुढे दलित समाजातील लोक मेलेल्या पशुंचं चामडं काढणं आणि मैला वाहून नेण्यासारखी कामं करणार नाहीत' असं म्हणणाऱ्या जिग्नेश यांचं नेतृत्व दलित समाजानं मान्य केलं. या मोर्च्यातूनच जिग्नेश यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली.
काँग्रेसचा पाठिंबा...
भाजपच्या विक्रमभाई चक्रवर्ती यांचा पराभव करत तरुण नेते जिग्नेश मेवाणी यांनी हा विजय पटकावलाय. मेवाणी यांना काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला होता.
सामाजिक कार्यकर्त्यांचं पाठबळ
गुजरात विधानसभा निवडणुकीत जिग्नेश मेवाणी यांना काँग्रेससोबतजच सामाजिक कार्यकर्त्या आणि बुकर पुरस्कारानं सन्मानित लेखिका अरुंधती रॉय यांनीही पाठिंबा दर्शवला होता. निवडणुकीसाठी मदत म्हणून रॉय यांनी ३ लाखांचं डोनेशनही दिलं होतं.
अज्ञातांकडून हल्ला
डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मेवाणी यांच्या वाहनांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता. वडगाम विधानसभा मतदारसंघातच हा प्रकार घडला. आपल्यावर हल्ला करणारे भाजपचे कार्यकर्ते होते, असा आरोप मेवानी यांनी केला होता.
मतदार संघात दोनदा मतदान
चार विधानसभा क्षेत्रांतील ६ मतदान केंद्रांवर रविवारी दुसऱ्यांदा मतदान पार पडलं होतं. या बुथवर ७० टक्क्यांहून जास्त मतदान झालं होतं. परंतु, दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनी ८ ते १० मशीनमध्ये बिघाड असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर एक-दोन तास मतदान बंद करण्यात आलं होतं. निवडणूक आयोगानं जाहीर केल्यानंतर वीरमगाममध्ये दोन आणि सावलीमध्ये दोन, वडगाम आणि दास्करोई क्षेत्रांतील एक-एक मतदान केंद्रावर पुन्हा मतदान पार पडलं. त्यानंतर आज झालेल्या मतमोजणीत जिग्नेश मेवाणी यांनी वडगाम मतदारसंघात बाजी मारल्याचं स्पष्ट झालंय.