2 वर्षांच्या चिमुकल्याच्या श्वसनलिकेत तब्बल 21 तास अडकला खिळा
कोलकात्यातील डॉक्टरांनी एका दोन वर्षांच्या मुलीला मृत्यूच्या दाढेतून परत आणलंय
मुंबई : 'म्हणतात ना...देव तारी त्याला कोण मारी' याचीच प्रचिती कोलकात्यामध्ये आली आहे. कोलकात्यातील डॉक्टरांनी एका दोन वर्षांच्या मुलीला मृत्यूच्या दाढेतून परत आणलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकल्याच्या श्वासनलिकेत तब्बल 21 तास खिळा अडकून बसला होता. अखेर डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर हा खिळा काढून टाकण्यात आला आहे.
रविवारी सकाळी पश्चिम बंगालमधील मालदा येथून एसएसकेएम रूग्णालयात या 2 वर्षांच्या चिमुकल्याला आणण्यात आलं. ज्यावेळी मुलाला रूग्णालयात आणण्यात आलं त्यावेळी त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता.
बाळाचा ऑक्सिजन लेवलदेखील 94-95 पर्यंत आला होता. याचशिवाय हृदयाचे ठोकेही मंदावत असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. अखेर कान-नाक-घसा तज्ज्ञांच्या डॉक्टरांनी दुर्मिळ शस्त्रक्रिया करत हा खिळा काढून टाकला आहे.
रूग्णालयाच्या माहितीप्रमाणे, हे बाळ शनिवारी घराबाहेर खेळत होतं. काहीवेळाने त्याला उल्ट्यांचा त्रास होऊ लागला. तो जोर-जोरात श्वास घेत होता. त्यावेळी बाळाच्या आईला त्याने काहीतरी गिळलं असल्याचा संशय आला. बाळाला जवळच्या एका रूग्णालयात नेण्यात आलं. मात्र उलट्यांचा त्रास अधिक होत असल्याचं लक्षात येताच त्यांनी कोलकातात्यातील रूग्णालयात दाखल केलं गेलं.
बाळावर उपचार केलेल्या डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, ज्यावेळी बाळाला रूग्णालयात दाखल करण्यात आलं त्यावेळी त्याला फार त्रास होत होता. एक्स-रेच्या माध्यमातून बाळाच्या श्वासनलिकेत सात इंचाचा खिळा अडकल्याचं दिसलंय आम्ही लगेच ब्राँकोस्कोपी सर्जरी करून खिळा बाहेर काढला. बाळाची परिस्थिती आता स्थिर असून त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे