Kolkata Rape Case ला नवं वळण! आरोपीने पोलीस अधिकाऱ्याबरोबर काढलेल्या सेल्फीने खळबळ
Kolkata Doctor Rape murder Case: या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी सुरु असतानाच आता सदर प्रकरणात एक नवीन माहिती समोर आली आहे.
Kolkata Doctor Rape murder Case: संपूर्ण देशाला हादरवून सोडणारी घटनी 9 ऑगस्ट रोजी कोलकात्यामधील आर. जी. कर रुग्णालयामध्ये घडली. 31 वर्षीय शिकावू महिला डॉक्टरवर निघ्रृणपणे बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणाला जवळपास दोन आठवडे होत आले आहेत. मात्र या प्रकरणामधील आरोपींची नेमकी संख्या किती आहे याचा शोध अद्याप पूर्ण झालेला नाही. या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयकडून केला जात आहे. पीडितेच्या पालकांनी ज्या पद्धतीने त्यांच्या मुलीवर अत्याचार झाले आहेत ते पाहता हे कोणत्या एका व्यक्तीचं काम नाही असं म्हणत यामध्ये इतरही लोकांचा समावेश असणार अशी शक्यता व्यक्त केली आहे. या प्रकरणामध्ये सदर हॉस्पीटलमध्ये पोलीस स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या संजय रॉयला अटक करण्यात आली आहे. संजय रॉयची चौकशी केली जात असतानाच त्याची पॉलिग्राफी चाचणी होण्याचीही शक्यात व्यक्त केली जात आहे. सीबीआयच्या रडारवर आता संजयबरोबरच इतरही अनेक लोक आहेत. विशेष म्हणजे यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे.
आरोपीबरोबरचा फोटो झाला व्हायरल
20 ऑगस्ट रोजी सीबीआयने संजय रॉयचा निकटवर्तीय असलेला सहाय्यक पोलीस निरिक्षक (एएसआय) अरूप दत्ता यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. सोशल मीडियावर याच अरूप दत्ता यांचा प्रसारमाध्यमांपासून पळ काढत सीबीआयच्या कार्यालयामध्ये धावत जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता याच अरूप दत्ता यांची नव्याने चर्चा सुरु होण्याचं कारण म्हणजे त्यांचा आरोपी संजय रॉयबरोबरचा एक सेल्फी व्हायरल झाला आहे. या फोटोवरुन संजय रॉय आणि अरूप दत्ता यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध असल्याचा दावा केला जात आहे. हा सेल्फी आरोपी संजय रॉयने काढल्याचं फोटो पाहिल्यावर स्पष्ट होत आहे.
सीबीआयने कोणते प्रश्न विचारले?
एएसआय अरूप दत्ता यांची सीबीआयने आठ तास चौकशी केली. त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलवलं जाण्याची दाट शक्यता आहे. आरोपी संजय रॉयबरोबर तुमचा काय संबंध आहे? तुम्ही संजय रॉयला रुग्णालयामध्ये जवळपास सर्वच विभागांमध्ये प्रवेश करण्याची परवानगी कोणत्या आधारे आणि नेमकी कशासाठी दिली होती? गुन्हा घडल्याचं कधी कळलं? असे प्रश्न सीबीआयने अरूप दत्ता यांना विचारले.
आरोपीला काम या पोलीस अधिकाऱ्यानेच दिलं?
सध्या चर्चेत असलेल्या फोटोमध्ये संजय रॉय पोलीस अधिकाऱ्यांबरोबर सेल्फी काढताना दिसत आहे. यामध्ये फोटोच्या अगदी विरुद्ध बाजूला काळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये एएसआय अरूप दत्ता दिसत आहे. या फोटोमध्ये इतरही अनेक लोक आहेत. मात्र या आरोपीबरोबर एएसआयचा फोटो कसा आणि या दोघांचे नेमके काय संबंध आहेत याचा तपास आता पोलीस करत आङेत. संजय रॉयला 2019 साली आपत्ती व्यवस्थापनाच्या तुकडीच्या माध्यमातून कर्मचारी म्हणून रुग्णालयामध्ये भरती करुन घेण्यात आलं होतं. मात्र त्याने या पोस्टवर कधीच काम केलं नाही. त्याने याउलट त्याने पोलीस वेलफेअर बोर्डामधून स्वयंसेवक पदावर काम करण्यास पसंती दिली होती. या ठिकाणी त्याला कामावर लावण्यात अरूप दत्तांचा काही हात आहे का याचाही शोध घेतला जात असल्याचं समजतं.