कोरोना संशयित म्हणत इंडिगोच्या महिला कर्मचाऱ्याला शेजाऱ्यांकडून त्रास
त्यांच्या आईकडेही संशयित म्हणून पाहिलं जात आहे
नवी दिल्ली : सध्याच्या घडीला Corona कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव भारतात वाढताना दिसत आहे. यामध्येच आता बाहेरगावाहून येणाऱ्या किंवा दुसऱ्या प्रदेशातून येणाऱ्यांकडेही कोरोना संशयितांच्या नजरेतून पाहिलं जात आहे. त्यामुळे एकिकडे कोरोनाला पळवून लावण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या प्रशासनापुढे समाजाच्या मानसिकतेवरही कटाक्ष टाकावा लागणार आहे.
नुकतीच कोलकात्यातील अशीच एक घटना या साऱ्याला प्रकाशझोतात आणून गेली आहे. जेथे इंडिगो या विमानसेवा पुरवणाऱ्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचारी महिलेला आणि तिच्या आईला शेजाऱ्यांच्या रोषाचा आणि विचित्र वागणुकीचा सामना करावा लागत आहे.
अमृता साहा असं या महिलेचं नाव असून, त्या इंडिगोमध्ये केबिन क्र्यू म्हणून काम पाहतात. सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ अनेकांचं लक्ष वेधत आहे, ज्यामध्ये कोरोना संशयित असल्याच्या मुद्द्यावरुन आपल्याला आणि आपल्या आईला शेजाऱ्यांकडून संशयाच्या नजरेने पाहिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या आईला शेजाऱ्यांनी मुलगी विमानवसेवा कंपनीत काम करत असून, परदेशवारीही करते त्यामुळे तिलाही कोरोना झालेला असू शकतो असं म्हणत हिणवलं. इतकंच नव्हे तर, किराणा मालाच्या दुकानात गेलं असताही त्यांना किराणा देण्यास नकार देण्यात आला. शिवाय जबरदस्तीने तुम्हाला रुग्णालात नेऊ अशी धमकीही त्यांना देण्यात आली. सोमवारी सायंकाळी अमृता जेव्हा त्यांच्या कामाहून घरी परतल्या तेव्हा अनेकांनीच त्यांच्या घराबाहेर त्यांना धमकावण्यासाठी गर्दी केली होती. कोलकाता पोलिसांनीही या दोन्ही महिलांची मदत करण्यास नकार दिला. पण, अमृताने व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर मात्र त्यांना मदत करण्यात आली. शिवाय या परिसरात कोरोनाविषयी जनजागृती मोहिम सुरु करणार असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.
कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णांपासून इतरांना या व्हायरसची लागण होऊ नये यासाठी विलगीकरण कक्षात ठेवलं जातं. मुळात कोरोना बराही होतो. पण, सध्याच्या घडीला समाजात असणारं एकंदर भीतीचं वातावरण पाहता, कोरोना पळवून लावताना अनेक ठिकाणी माणुसकीसुद्धा पळवून लावली जात आहे, ही परिस्थिती बदलणं तितकंच गरजेचं आहे.